महापालिकेने येथील सावरकर तरण तलावाजवळ उभारलेल्या अद्ययावत हेल्थ सेंटर व व्यायामशाळेची अवस्था बिकट झाली असून सहा महिन्यांपासून हेल्थ सेंटरमधील साहित्याची कोणतीही देखभाल केली जात नाही. अनेक साहित्यांची दुरूस्ती करण्याची वेळ आली आहे.
या साहित्याची दुरूस्ती करावी तसेच नवीन साहित्य आणावे अशी मागणी ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
या हेल्थ सेंटरमध्ये सुमारे ४०० तरुणांनी प्रवेश घेतलेला आहे. त्याची वार्षिक फी ८३५ रूपये आहे. सहा महिन्यापासून या सेंटरमधील जवळपास सर्व उपकरणे उदा. पेकडेक, थाइज् मशीन, बेंच, मशीनच्या पुलीची वायर या तुटल्या आहेत.
या यंत्रणेची  दैनंदिन देखभाल व स्वच्छताही होत नसल्याच्या तक्रारी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीकडे लेखी स्वरूपात आल्यामुळे विलास देवळे, कृष्णा गडकरी, जगन्नाथ ताठे आदींचा समावेश असलेले शिष्टमंडळ महापौर यतिन वाघ यांना भेटले.
हेल्थ सेंटरमधील तुटकी उपकरणे दुरूस्त करावीत व नवीन उपकरणे घ्यावीत अशी मागणी त्यांनी केली. महापौरांनी नवीन उपकरणे लवकरच बसविण्यात येतील असे आश्वासन दिले. आयुक्तांनीही सेंटरमध्ये त्वरित सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भात नागरिकांनी देवळे यांच्याशी ९४२२२६६१३३ वर संपर्क करावा.