ह.भ.प शंकरराव काळेमहाराज एरंडेश्वरकर यांच्यासह वारकरी संप्रदायातील आठ जणांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प सोडला. या सर्वानी बुधवारी जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ.   एकनाथ   माले    यांच्याकडे देहदानासंदर्भात संमतिपत्र दिले.
गेली अनेक वर्षे वारकरी संप्रदायात राहून पंढरीच्या विठ्ठलाची भक्ती करणारे आणि आपल्या वाणीतून अध्यात्माचा प्रसार करणारे एरंडेश्वर येथील ह.भ.प शंकरराव काळे यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला. काळे यांच्यासोबतच नित्यनियमाने पंढरपूरची वारी करणारे त्यांचे इतर सात सहकारी यांनीही हा निर्णय घेतला.
नागनाथमहाराज पवार वझुरकर, प्रसादमहाराज काळे एरंडेश्वरकर, विठ्ठलराव बाबुराव काळे, एरंडेश्वर ते पंढरपूर पायी िदडींचे नेतृत्व करणारे साहेबराव धोंडीराम काळे, प्रयागबाई बापुराव चव्हाण एरंडेश्वरकर, श्रीमती गंगासागर नागनाथ पवार वझुरकर, दत्तराव मारोतराव गमे दामपुरीकर यांनी हा संकल्प केला.
शंकरराव काळेमहाराज यांना वारकरी सांप्रदायातील योगदानाबद्दल अखिल भारतीय वारकरी मंडळाने आदर्श वारकरी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. काळेमहाराज यांच्या प्रबोधनातून हे सर्व देहदानास स्वेच्छेने प्रवृत्त झाले. बुधवारी जिल्हा रुग्णालयात जाऊन या सर्वानी मरणोत्तर देहदानाचे संमतिपत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांच्याकडे दिले. वारकऱ्यांनी घेतलेला हा निर्णय इतरांसाठी आदर्श व प्रेरणादायी ठरणारा आहे. परभणी जिल्हय़ातून प्रथमच एकाच वेळी मरणोत्तर देहदानाचे आठ अर्ज आले आहेत.