शहरातील बेलापूर रस्ता व मोरगेवस्ती भागात आज रात्री आठ ठिकाणी दुकाने फोडून मोठा ऐवज लंपास केला. वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या निवासस्थानानजीक चोरटय़ांनी चो-या करून पोलिसांपुढेच आव्हान उभे केले आहे.
बेलापूर रस्त्यालगत अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे, तर उपाधीक्षक अंबादास गांगुर्डे व निरीक्षक प्रकाश सपकाळे यांचे मोरगेवस्ती भागात निवासस्थान आहे. अधिका-यांच्या या निवासस्थानापासून जवळच असलेली दुकाने चोरटय़ांनी आज फोडली. हायमॅक्स दिव्यांचा लखलखाट असलेल्या या भागात चोरटय़ांनी हात मारला.
मोरगेवस्ती भागातील दत्तमंदिरातील दानपेटी फोडून चोरटय़ांनी देणगीची रक्कम चोरली. त्यानंतर समर्थ महामुनी यांचे स्वामी समर्थ ज्वेलर्स, सुरेश गादिया यांचे किराणा दुकान, सचिन अहिरराव यांचे सोन्याचांदीचे दुकान, प्रमोद आगरकर यांचा केक शॉप, तर बेलापूर रस्त्यावर सयाजी काने यांचे श्रद्धा मेडिकल, प्रतीक बोरावके यांची बोरावके शॉपी व जावेद किराणा ही दुकाने चोरटय़ांनी फोडली. दुकानांचे शटर उचकटून या चो-या करण्यात आल्या.
शहरात दिवसाला एक तरी चोरी होत आहे. एकाही चोरीचा तपास पोलिसांना लावता आलेला नाही. आता गुन्हेगारांनी पोलीस अधिका-यांच्या निवासस्थानासमोरच चो-या केल्या. नगरसेवक संजय छल्लारे यांनी आज पोलीस निरीक्षक सपकाळे यांना निवेदन देऊन चो-यांचा तपास लागला नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मोरगेवस्ती भागात पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.