फॅशनेबल कपडे, सेलफोनपासून फळ-भाज्यांच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या जुहूचा इर्ला सोसायटी रस्त्यावर फेरीवाल्यांची बजबजपुरी आता चांगलीच वाढली आहे. अर्धा रस्ता फेरीवाल्यांनी बळकावल्याने येथील वाहतूक खोळंबण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी हा अध्र्या किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिटे लागू लागले आहेत.
तयार कपडे, मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असो वा फळे, भाज्यांपासून काहीही एकाच ठिकाणी मिळण्याचे हमखास ठिकाण म्हणजे जुहू येथील इर्ला सोसायटी रस्ता. या रस्त्यावर दर दिवशी लाखो रुपयांची उलाढाल होते. परंतु, जो रस्ता पार करण्यासाठी अवघ्या काही मिनिटांचा कालावधी लागतो त्यावर तासन्तास वाहतूक अडून राहते आहे. या मुख्य रहदारीच्या रस्त्यावरील बाजारातच नव्हे तर फक्त पदपथच नव्हे तर रस्त्यावरील अध्र्या भागात अतिक्रमण झाले आहे. त्यातच रस्त्यावर गाडय़ा उभ्या केल्यानंतरही कारवाई होत नसल्यामुळे फक्त अध्र्याहून कमी किलोमीटरचा हा महत्त्वाचा रस्ता पार करण्यासाठी तब्बल वीस ते पंचवीस मिनिटांचा कालावधी लागत आहे. पालिका आणि वाहतूक पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे येथील रहिवाशांना दररोज नाइलाजाने येथील वाहतूक कोंडीला तोंड देत प्रवास करावा लागतो आहे.
कूपर रुग्णालयासमोरील लिंक रोड ते स्वामी विवेकानंद यांना जोडणारा रस्ता इर्ला रोड म्हणून ओळखला जातो. परंतु आठवडय़ाचे सातही दिवस मध्यरात्र वगळता प्रत्येक प्रहरी या रस्त्यावर वाहतूक कोंडी असते. किंबहुना रस्त्याच्या दुतर्फा बिनधास्तपणे गाडय़ा उभ्या करून खरेदीकरिता जाणाऱ्या उच्चभ्रूंपुढे वाहतूक पोलीसही नतमस्तक झाल्यासारखे वागतात. डी. एन. नगर वाहतूक पोलिसांची वाहने वाहून नेणारी क्रेन या मार्गावर कधीच फिरकत नाही, हेही विशेष. फिरकलीच तरी या उभ्या असलेल्या गाडय़ांकडे ढुंकूनही पाहिले जात नाही.
या ठिकाणी असलेल्या दुकानांनी पावसाळ्यापासून संरक्षणाच्या नावाखाली मोठमोठय़ा शेड्स उभारून त्यातही छोटय़ा ठेलेधारकांना भाडय़ाने जागा दिली आहे. या प्रत्येक ठेलेधारकांकडून पालिकेला हप्ता मिळत असल्यामुळे इर्ला रोडवर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीला तोंड देत पदपथाऐवजी रस्त्यावर चालून जीव मुठीत घेऊन सामान्य नागरिकाला वावरावे लागत आहे.

‘इर्ला रस्ता बचाव’ आंदोलन
या विरोधात भाजपचे पदाधिकारी राजेश मेहता यांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. पालिका तसेच वाहतूक पोलिसांनी पदपथावरील अतिक्रमण आणि प्रचंड वाहतूक कोंडी येत्या आठवडय़ाभरात आटोक्यात न आणल्यास उपोषणाचा इशारा मेहता यांनी दिला आहे. परंतु कारवाईचे नाटक केले जात आहे. त्यामुळे सामान्यांना मोकळा श्वास घेता यावा, यासाठी आपण आता इर्ला रस्ता बचाव आंदोलन सुरू करीत असल्याचेही मेहता यांनी सांगितले.

‘पुडी’मध्ये दडलंय अकार्यक्षमतेचे कारण
इर्ला मार्गावरील दुतर्फा असलेल्या तब्बल ४० ते ५० दुकानांकडून मिळणारी ‘पुडी’ हे प्रमुख कारण वाहतूक पोलिसांच्या अकार्यक्षमतेमागे असल्याचे सांगितले जाते. याशिवाय पदपथावरही अनेक ठेले मांडण्यात आले आहे. हे ठेलेधारक म्हणजे दुकानदारांना भाडे देत आहेत. याबाबत के पश्चिम विभाग कार्यालयाकडे तक्रारी करूनही दाद न घेण्यामागेही मोठय़ा प्रमाणात मिळणारा हप्ता हेच कारण सांगितले जात आहे.