नगर शहराजवळील जिल्हा परिषदेच्या केडगाव प्राथमिक शाळेच्या १३ वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीच्या कामात अपहार केल्याप्रकरणी शाखा अभियंता एस. ए. पोवार व आर. जी. पानसंबळ या दोघांना आज निलंबित करण्यात आले. दरम्यान या दोघांसह कार्यकारी अभियंता पोपट खंडागळे व काम करणारी संस्था भीमा मजूर सहकारी संस्था या चौघांनी अपहाराची ८ लाख ६४ हजार ९७१ रुपये आज जिल्हा परिषदेच्या खात्यात जमा केल्याचे चौकशी करता समजले. संस्थेसही काळ्या यादीत टाकण्याचा आदेश देण्यात आला.
केडगावच्या शाळा खोल्यांच्या दुरुस्तीच्या ९ लाख १५ हजार ३९४ रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आली होती. मात्र काम न करताच ९ लाख १४ हजार ८०९ रुपयांचे बिल काढले गेले होते. तक्रार झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या तपासणीत केवळ ५० हजार रुपयांचे काम करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. त्याबद्दल चौकशी समितीने वरील चौघांवर अपहार व गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवला होता.
त्यानुसार सीईओ रुबल अग्रवाल यांनी अपहाराची रक्कम चौघांकडून चार दिवसांत वसूल करण्याचा आदेश दिला होता. जि. प. प्रशासनाने चौघांना समप्रमाणात, प्रत्येकी २ लाख १६ हजार रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. या चौघांनी आज एकत्रितपणे जिल्हा सहकारी बँकेत एकाच चलनाद्वारे ही रक्कम जि. प.च्या नावे जमा केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान अग्रवाल यांनी शाखा अभियंता पोवार व पानसंबळ या दोघांना निलंबित करण्याचे आदेश आज काढले.
चौघांनी अपहाराची रक्कम जमा केल्याने गुन्ह्य़ाची एक प्रकारे कबुलीच दिल्याचे मानले जाते. दरम्यान रक्कम वसूल झाली तरी चौघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार का, याकडे जि. प. वर्तुळाचे लक्ष राहील.