ग्रामपंचायतीमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बाभुळवाडे व लोणीमावळा येथील महिला सरपंचांसह ग्रामसेवकास पारनेर पोलिसांनी चौकशीसाठी शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले. चौकशी सुरू असतानाच विभागीय आयुक्त गावडे यांनी या गैरव्यवहारांची पुनर्तपासणी करून गुन्हे दाखल करण्याचा आदेश गटविकास अधिकारी किरण महाजन यांना दिल्याने चौकशीनंतर या तिघांनाही पोलिसांनी सोडून दिले.
आर्थीक गैरव्यवहार प्रकरणी बाभुळवाडय़ाच्या सरपंच मनिषा क्षिरसागर, लोणीमावळाच्या सरपंच सुनिता चासकर तसेच दोन्ही गावचे ग्रामसेवक म्हणून काम पाहणारे एम. बी. गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यासंदर्भात आयुक्तांच्याच आदेशानुसार सरंपच तसेच ग्रामसेवकावर गुन्हे दाखल करण्याचे पत्र पारनेर पोलिसांना देण्यात आले होते. या पत्रानुसार पारनेर पोलिसांना तिघांना ताब्यात घेतले होते.
पोलिसांच्या कारवाईनंतर मात्र पंचायत समिती प्रशासनात जोरदार चक्रे फिरून थेट विभागीय आयुक्तांपर्यत संपर्क करण्यात आला. विभागीय आयुक्त गावडे यांनी गटविकास अधिकारी किरण महाजन यांना आदेश देऊन पुनर्तपासणी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. महाजन यांनी तसे पत्र पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही सोडून दिले.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार विभागिय उपायुक्त गावडे व लोणीमावळाच्या सरपंच सुनिता चासकर हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. यापूर्वी चासकर यांच्या सासऱ्यांनी यापूर्वी थेट गावडे यांच्याकडे ग्रामसेवक गायकवाड यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर गावडे यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले होते. गायकवाड यांना धडा शिकविण्याच्या नादात चासकर याच या चौकशीत दोषी आढळल्याने हे प्रकरण त्यांच्यावरच उलटले आहे.