रेल्वे मंत्रालयाकडून नगर जिल्ह्य़ाची गेली अनेक वर्षे फक्त उपेक्षाच सुरू आहे. यावर्षीच्या रेल्वे अंदाजपत्रकात तरी दौंड-मनमाड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, नगर-माळशेज रेल्वेमार्ग, नगर-परळी रेल्वे तसेच नगर-पुणे रेल्वे या मार्गासाठी तरतूद व्हावी यासाठी नगरच्या दोन्ही खासदारांनी आपली शक्ती पणाला लावावी असे आवाहन जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी केले आहे.
खासदार दिलीप गांधी व खासदार भाऊसाहेब वाक्चौरे या दोघांनीही जिल्ह्य़ाच्या रेल्वे प्रश्नाची चांगली जाण आहे. दौंड मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाले तर नगरसाठी ते वरदान ठरणार आहे. फक्त २३८ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग उत्तर भारत व दक्षिण भारत जोडणारा आहे, मात्र तो एकेरी असल्याने त्यावर नव्या गाडय़ांची मागणी मंजूर होत नाही. त्यामुळे या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी प्रयत्न व्हावेत अशी जिल्हा प्रवासी संघटनेची अपेक्षा असल्याचे मेहता यांनी म्हटले आहे.
नगर पुणे हा रेल्वे मार्ग अस्तित्वात आला तर त्यामुळे रस्त्यावर होणारे सर्व जीवघेणे अपघात कमी होतील. इंधन वाचेल. नगर पुण्याचा दररोजचा व्यापार, उद्योग वाढेल. नगरचा चेहरामोहरा गतीने बदलायचा असेल तर त्यासाठी एवढे एक काम झाले तरी पुरेसे आहे. मात्र वारंवार मागणी होत असूनही रेल्वे मंत्रालयाचे याकडे लक्ष नाही. कल्याण-नगर -परळी अशी रेल्वे झाली तर नगर व मराठवाडा थेट मुंबईशी रेल्वेने जोडला जाणार आहे. यामुळेही नगरच्या उद्योगव्यवसायात भर पडून शहर विकासाचा वेग वाढणार आहे असे जिल्हा प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे.
जिल्ह्य़ाच्या खासदार द्वयीचे प्रयत्न सुरूच आहेत, मात्र त्यांना यशाचे पंख लाभावेत यासाठी त्यांनी आणखी जोर लावण्याची गरज आहे. औरंगाबाद-नगर-पुणे किंवा कल्याण-नगर-परळी या दोन्ही पैकी किमान एका मार्गासाठी तरी अंदाजपत्रकात काही तरतुद व्हावी म्हणून दोन्ही खासदारांनी एकत्रित प्रयत्न करावेत, त्यांना प्रवासी संघटना आवश्यक ती सर्व मदत करण्यास तयार आहे असे मेहता यांनी त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.