आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या आरोग्य संस्थेच्या बृहत आराखडय़ात नाशिक जिल्ह्य़ात आठ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, १९ आरोग्य उपकेंद्रे, सिन्नर येथे नव्याने ग्रामीण रुग्णालय आणि इगतपुरी, सिन्नर या राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यांच्या ठिकाणी ‘ट्रामा केअर युनिट’ सुरू होणार आहे. तसेच अतिरिक्त ६१५ आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे मंजूर झाली असून सध्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात आरोग्य सेविकांची ३६७ पदे, पुरुष आरोग्य सेवकांची २१०, वैद्यकीय अधिकाऱ्यांची १४, तर प्रयोगशाळा तंत्रज्ञांची १४ अशी पदांची संख्या वाढणार आहे.
नागरिकांना घराजवळच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा हेतू या आराखडय़ात असून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्य़ातील अधिकाधिक गावांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी या आराखडय़ाद्वारे प्रयत्न केले आहेत. १९९७ मध्ये आरोग्य सुविधांविषयी बृहत आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर हा आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखडय़ाच्या अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद केली जाणार आहे. माता व बालमृत्यू कमी करणे आणि लोकसंख्यावाढीवर नियंत्रण ठेवणे, या मुख्य उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणे यामुळे शक्य होणार आहे. आठ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांत पिंपरी सय्यद, लहवित, अंजनेरी, खडकजांब, उंबरगव्हाण, तळवाडे भामेर, सामुंडी, भारम यांचा समावेश आहे. १९ आरोग्य उपकेंद्रांत अलंगुण, वायगाव, दसाने, ठाणगाव, लेंडाणे, विराणे, वाखारी, सावरगाव, मेसनखेडे, नंदूरटेक, भायाळे, खडकजांब, विंचूर गवळी, पाडळी, बेलू, हिवरगाव, माळेगाव, भुलेगाव, खिर्डीसाठे या गावांचा समावेश आहे. सिन्नर येथे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे.
जिल्ह्य़ातील बहुतांश केंद्रांमध्ये आरोग्य सुविधा तोकडी असल्याचे आ. जयंत जाधव यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार अधिक लोकसंख्या असलेल्या उपकेंद्रांना अधिक मनुष्यबळ देण्याच्या उद्देशाने जिल्ह्य़ातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांना पदे मंजूर करण्यात आली आहेत.
जिल्ह्य़ात सध्याच्या तुलनेत २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, चार ग्रामीण रुग्णालये, १८० उपकेंद्रांची आवश्यकता असल्याचे आ. जाधव यांनी म्हटले होते. लोकसंख्येवर आधारित आणि दोन आरोग्य संस्थांमधील अंतर विचारात घेऊन संपूर्ण राज्यात विविध आरोग्य संस्था स्थापन करण्याचा आणि अस्तित्वात असलेल्या आरोग्य संस्थांच्या श्रेणीवर्धनाचा बृहत आराखडा शासनाने मान्य केला आहे.
 यामुळे जवळपास १२५७ आरोग्य संस्था स्थापन करण्यात येणार असून, अस्तित्वात असलेल्या ५७ विविध आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला  आहे. यामध्ये १९१६ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांसह एकूण २१ हजार १५२ विविध पदांची निर्मिती करण्यात आली आहे.