मृताच्या वारसदाराला २० कोटींची नुकसान भरपाई मिळणार असल्याचा ई-मेल पाठवून सोलापूरच्या शेतक ऱ्याला स्पेनच्या सहा भामटय़ांनी चार लाख २५ हजारांस गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
विश्वास श्रीनिवास शेंडे (वय ५७, रा. मेडिकल सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी एव्हिल मार्टिन जिमॅनस, जॉर्ज विल्यम, बॅ. रॉक निऑल कॅमा, सेझ मॅथ्यू व संजयकुमार रोमलिन (रा. बर्सिलोना कोर्ट, स्पेन) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वास शेंडे यांच्या परिचयाचे महमदसाहेब विजापुरे (रा. करजगी, ता. अक्कलकोट) यांना स्पेन येथून ई-मेल आला होता. यात विजापुरे यांचे नातेवाईक स्पेनमध्ये मरण पावले असून त्यांच्या नावे बँक ऑफ कॅन स्पेनमध्ये दोन मिलियन अमेरिकन डॉलर (२० कोटी) जमा आहे. ही रक्कम अदा करण्यासाठी मृताचे वारसदार म्हणून महमदसाहेब विजापुरे यांचे नाव नोंद असल्याची माहिती ई-मेलद्वारे प्राप्त झाली होती. हा ई-मेल इंग्रजी भाषेतील असल्याने त्यांनी आपल्या परिचयाचे विश्वास शेंडे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी ई-मेलचा अर्थ समजावून सांगितला तसेच पुढील कार्यवाही देखील विजापुरेंच्यावतीने त्यांनीच पूर्ण केली. शेंडे यांनी या ई-मेलवर विश्वास ठेवून आपल्या संगणकावरून ई-मेल करून उत्तर पाठविले. त्या वेळी स्पेनमधील आरोपींनी ही रक्कम पाठविण्यासाठी प्रोसेस फी व वकिलाची फी म्हणून रक्कम पाठविण्याची मागणी केली. त्यानुसार शेंडे यांनी वेळोवेळी आपल्या बँक खात्यावर चार लाख २३ हजारांची रक्कम जमा केली. त्यानंतर स्पेनमधून २० कोटींची रक्कम येण्याची वाट पाहिली. अखेर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे निदर्शनास आला.