गावातील विविध कार्यकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे शक्य न झाल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्येचा मार्ग पत्करला. मोहोळ तालुक्यातील भोयरे येथे बुधवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला.
ज्ञानदेव नामदेव चव्हाण (वय ५२) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ व बहिणी असा परिवार आहे. चव्हाण यांनी शेतीसाठी भोयरे येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेतून एक लाख २० हजारांचे कर्ज घेतले होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून पडलेला दुष्काळ व पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे त्यांची शेती नापीक झाली होती. त्याचवेळी कर्जवसुलीचा तगादा वाढल्यामुळे जीवन जगणे असह्य़ बनले होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या शेतातील वस्तीसमोर रामफळाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करीत मृत्यूला कवटाळले. मोहोळ पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्य़ात यंदाच्या दुष्काळी परिस्थिीत कर्जाला कंटाळून आतापर्यंत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. दुष्काळ असूनही शासनाने शेतकऱ्यांकडून कर्ज व त्यावरील व्याज, वीज थकबाकी वसुलीची कार्यवाही थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तरीदेखील बँकांसह इतर खासगी सावकार, फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.