02 December 2020

News Flash

अजब गजब पण लांबलेली प्रेमकहाणी!

बॉलीवूडमधील सरधोपट प्रेमकथांना संपूर्णपणे फाटा देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करू लागलेत. नायक-नायिकांच्या प्रेमात नायिकेचा बाप खलनायक ठरण्याचा जमाना आता गेला आहे. हे अधोरेखित करणारा आणखी एक

| June 23, 2013 05:04 am

बॉलीवूडमधील सरधोपट प्रेमकथांना संपूर्णपणे फाटा देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करू लागलेत. नायक-नायिकांच्या प्रेमात नायिकेचा बाप खलनायक ठरण्याचा जमाना आता गेला आहे. हे अधोरेखित करणारा आणखी एक सिनेमा म्हणजे ‘रांझना’. एका किरकोळ दिसणाऱ्या नायकाचे श्रीमंत-सुंदर दिसणाऱ्या नायिकेवर असलेले प्रेम आणि ती व्यक्त करण्याची त्याची पद्धत हे दाखविणारा हा सिनेमा आतापर्यंतच्या प्रेमकथापटांपेक्षा सर्वथा वेगळा ठरावा. ‘कोलावेरी डी’फेम धनुष या दाक्षिणात्य कलावंताने आपल्या पहिल्याच हिंदी सिनेमात साकारलेला नायक आणि धनुषचा अभिनय ठसा उमटविणारा ठरला आहे.
बनारसमध्ये राहणाऱ्या पंडित घराण्यातील कुंदन (धनुष) लहानपणीच झोया (सोनम कपूर) ला पाहतो आणि तिच्या प्रेमात पडतो. ती जिथे जाईल, तिथे तिचा पाठलाग करतो. तिच्यासमोर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘टिपिकल’ पद्धतीने हाताची नस कापून घेतो. झोया कुंदनवर भाळते, त्या अनवट वयात हेच प्रेम असे तिला वाटते. मग तिचे आई-वडील तिला बनारसपासून दूर शिक्षणासाठी पाठवितात. मोठी झाल्यावर झोया अतिशय प्रगल्भ बनून बनारसला परतते तेव्हा तिची आतुरतेने वाट पाहणाऱ्या कुंदनला ती ओळखतच नाही.
ओळख पटल्यानंतर त्याला झिडकारते, ते अल्लड वयातले प्रेम हे काही खरे नव्हते. पण कुंदन तिच्यासाठी झुरत राहतो. मग अचानक त्याला झोया सांगते की तिचे अक्रम नावाच्या तरूणावर प्रेम आहे आणि तिच्याशीच लग्न करणार. हे लग्न लावून देण्यासाठी कुंदन प्रयत्न करतो मात्र घडते निराळेच. या निराळ्या घटनांची जंत्री आणि त्यातून नायकाने प्रत्येकवेळी नायिकेप्रती व्यक्त केलेले प्रेम हाच चित्रपटाचा संपूर्ण विषय आहे.
पडद्यावर हा प्रेमकथापट उलगडत जातो तेव्हा प्रेक्षकही कुंदन या व्यक्तिरेखेशी समरस होत जातो. असे समरस होण्यासाठी धनुष या लहानखुऱ्या दिसणाऱ्या दाक्षिणात्य आणि सर्वसामान्य दिसणाऱ्या हडकुळ्या अभिनेत्याचा अभिनय कारणीभूत ठरतो.
नायक-नायिका यांची परस्परविरोधी व्यक्तिमत्वे, त्यातला संघर्ष, प्रेम व्यक्त करण्याची अनोखी पद्धत, कुंदनच्या तोंडी असलेले मध्यांतरापूर्वीचे दमदार संवाद ही भट्टी अशी काही जमली आहे की प्रेक्षक रमून जातो. परंतु, मध्यांतरानंतर भरकटलेले कथानक रटाळ होत जाते. अतिशय लांबलेले मध्यांतर आणि मध्यांतरानंतर नायिकेचे प्रेम असलेल्या तरुणाचे स्वप्न साकारण्यासाठी तिची चाललेली धडपड, त्यात कुंदनची झोयाला मिळालेली साथ, गैरसमज अशा एकेक घटना प्रसंग दाखविताना चित्रपट नको इतका लांबतो, कंटाळवाणा होतो हेही तितकेच खरे.
सोनम कपूरने साकारलेली झोया हा तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतला सगळ्यात चांगला अभिनय ठरावा. धनुष सर्वसामान्य दिसतो, परंतु, त्याने मध्यांतरापूर्वी साकारलेला सडाफटिंग नायक, फक्त नायिकेच्या मागे जाणारा कुंदन, मध्यांतरानंतर दु:खी-कष्टी बनलेला नायक चांगला साकारला आहे. मुळातच लेखक-दिग्दर्शकाने धनुषला नायक म्हणून हिंदीच्या रूपेरी पडद्यावर प्रस्थापित करण्यासाठीच जणू कुंदन व्यक्तिरेखा लिहिली असावी असे स्पष्टपणे जाणवते.
ए आर रहमानचे संगीत नेहमीपेक्षा वेगळे असले तरी तुम तक हे गाणे वगळता फारसे श्रवणीय नाही. संवाद हे चित्रपटाचे सामथ्र्य ठरते. परंतु, चित्रपट नको इतका लांबल्याने मध्यांतरानंतर प्रेक्षक चुळबळ करू लागतो. तरीही एकदा पाहायला हरकत नाही असा हा ‘रांझना’ आहे.
रांझना
निर्माता – कृषिका लुल्ला, दिग्दर्शक – आनंद एल राय, कथा-पटकथा-संवाद – हिमांशू शर्मा, संगीत – ए आर रहेमान
कलावंत – सोनम कपूर, धनुष, अभय देओल, मोहम्मद झिशान अयूब, शिल्पी मारवाह, स्वरा भास्कर, अरविंद गौर, सुरज सिंग, विपीन शर्मा, सुजाता कुमार कृष्णमूर्ती व अन्य.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2013 5:04 am

Web Title: fantastic curious but lengthy love story
टॅग Dhanush
Next Stories
1 फसवे मायाजाल..
2 ‘मर्द’चा विचार मराठीत उतरवताना..
3 जाहिरातीतही अभिनय लागतोच..
Just Now!
X