टिंग्या चित्रपटाला ५७ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असले तरी चित्रपट पाहिल्यानंतर वडिलांनी केलेला गौरव हा आपल्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार ठरला. तो ऑस्करपेक्षाही मोठा वाटतो, अशी भावना टिंग्या चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश हडवळे यांनी येथे व्यक्त केली.
लासलगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष चांगदेवराव होळकर होते. आपल्या आयुष्यात संख्येपेक्षा गुणवत्तेला अधिक महत्त्व असल्याचे ते म्हणाले. तरुणाईकरिता सध्याचा काळ संघर्षांचा असला तरी भविष्याचा विचार आतापासून करणे गरजेचे आहे, असा सल्ला हडवळे यांनी दिला. चित्रपटाकरिता अनेक दिग्दर्शकांचे उंबरे झिजविले. त्या काळात मोबाइल नव्हते. मी मुंबईतील क्वाइन बॉक्सचा नंबर संपर्काकरता देत असे. दिग्दर्शक आपल्याशी संपर्क करतील म्हणून दिवसभर क्वाइन बॉक्सजवळ बसायचो. दहावी-बारावी परीक्षेत मी कमी टक्के मिळविले असले तरी आता चित्रपटातून शंभर टक्के मिळविण्याचा प्रयत्न केला आहे, असेही हडवळे यांनी सांगितले.व्यासपीठावर महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर, सदस्य किसनसिंग भल्ला, जयवंत जाधव, अ‍ॅड. केदारनाथ बुब, योगेश पाटील, प्राचार्य डॉ. दिनेश नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हडवळे यांचा परिचय कवी प्रकाश होळकर यांनी जमिनीवर पाय व आभाळाला हात पोहोचलेलं व्यक्तिमत्त्व, या शब्दांत करून दिला. प्रास्ताविक प्रा. आर. बी. पाटील यांनी केले. प्राचार्य डॉ. दिनेश नाईक यांनी महाविद्यालयाचा लेखाजोखा मांडला.