विभागात इतरत्र वरुणराजा भरभरून प्रसन्न होत असला, तरी परंडा तालुक्यावर मात्र त्याची वक्रदृष्टी सुरूच आहे. पावसाळ्याचे दोन महिने सरले. मात्र, परंडा तालुक्यातील नदीनाले, ओढे अजूनही वाहिले नाहीत. तालुक्यातील १२ गावांमध्ये भर पावसाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील सर्व महत्वाचे प्रकल्प कोरडेच असून गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जास्तीचा पाऊस होऊनही पाणीटंचाईची स्थिती कायम आहे. त्यामुळे शहरासह तालुक्याचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.
तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ६१५ मिमी आहे. दि. १ ऑगस्टपर्यंत २५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. परंडा शहरात १० दिवसांतून एकदा नळाला पाणी येत आहे. ग्रामीण भागात ३१ जुलैपर्यंत ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे पंचायत समिती अधिकाऱ्यांनी सांगितले.