येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यावरील खोलीत सोमवारी सकाळी सात वाजता अचानक लागलेल्या आगीत शासकीय दस्तावेज भस्मसात झाले. कार्यालयाने बरीच माहिती संगणकीकृत केली असल्याचे सांगत जळालेली कागदपत्रे फारशी महत्वाची नसल्याचे या विभागाचे म्हणणे आहे. तथापि, वाहनांशी संबंधित दस्तावेज या पध्दतीने भस्मसात होण्यामागे संशयही व्यक्त केला जात आहे. अग्निशमन विभागाने तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश मिळवले. महत्वाचे दस्ताऐवज जळून खाक झाले असले तरी बहुतांश संगणकीय नोंदी झाल्याने कामकाजात अडथळा येणार नसल्याचे या कार्यालयाने म्हटले आहे.
तळमजल्यावर वाहनांशी संदर्भातील कागदपत्रांचे नूतनीकरण, वाहन चालविण्याचा परवाना आदींसह मुख्य अधिकाऱ्यांचे कक्ष आहेत. या ठिकाणी मागील बाजुस दुचाकी, चारचाकी, प्रवासी वाहतूक करणारी वाहने आदींचे परवाने देणाऱ्या कागदपत्रांची नोंदी असणारी ‘रेकॉर्ड रुम’ आहे. सोमवारी सकाळी याच खोलीत अचानक आग लागली. कागदपत्रांचे बरेच गठ्ठे असल्याने काही वेळात ती पसरत गेली. आगीत महत्वपूर्ण कागदपत्रांसह कार्यालयीन फर्निचर भस्मसात झाले. दरम्यानच्या काळात अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचवटी विभागाचे दोन तसेच मुख्यालयातून खास ‘बाऊझर’ मागविण्यात आला. रेकॉर्ड रुमनंतर लगतच्या खोलीस आगीची झळ पोहचल्याने काही अंशी नुकसान झाले आहे. तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यास यश आले. आग कशामुळे लागली आणि नुकसान किती झाले याची स्पष्टता झालेली नाही. दरम्यान, आगीमुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा येईल अशी शक्यता असतानाच कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ‘रेकॉर्ड रुम’मधील बहुतांश कागदपत्रांच्या संगणकीय नोंदी झाल्याने कामात अडथळा येणार नसल्याचे सांगितले.