गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीजवळ मोटारीच्या गोदामास सोमवारी दुपारी आग लागली. यामध्ये १० मोटारी जळून खाक झाल्या. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १ कोटी रु पयांचे नुकसान झाले आहे.
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत व मयूर पेट्रोलपंप या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे माव्र्हलेस मोटर्स नावाचे गोदाम आहे. याठिकाणी सुमारे शंभराहून अधिक नवीन वाहने ठेवलेली होती. या गोदामाजवळ विद्युत मंडळाचे ट्रान्सफॉर्मर आहे. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास या ट्रान्सफॉर्मरची ठिणगी उडून गवतावर पडली. गवत वाळलेले असल्याने आणि वारा वाहत असल्याने आग पसरत गेली. आग गोदामातही गेल्याने आतील वाहने एकामागून एक पेट घेत राहिली. सुमारे तासभर आग भडकत राहिल्याने ८ इंडिका, २ एरिया व १ सफारी अशी मोटारीची मॉडेल्स जळून खाक झाली.
आग लागल्याचे समजताच कोल्हापूर महानगरपालिका, कागल नगरपालिका, औद्योगिक वसाहतीतील टँकर यांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यातील अधिकारी व पोलिस पोहोचले होते. त्यांनी गोदामाचे व्यवस्थापक राजेंद्र मुसळे यांच्याकडून आग कशी लागली याची माहिती घेतली.