कराड नगरपालिकेने वार्षिक संकलित करात वाढ केल्याच्या निषेधार्थ भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कराच्या नोटिसांची होळी करून निषेध नोंदवला. डॉ. गिरीश देशपांडे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात विशाल उकिरडे, मोहन अनंतपूरकर, गणेश कापसे, सुरेश अतनूर, प्रतीक घोडके, प्रसाद देशमुख, जावेद इनामदार, सुरेंद्र भस्मे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यासंदर्भात नगरपालिका मुख्याधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कराड नगरपालिकेने करात वाढ करण्याचा घाट घातला आहे. तशाप्रकारच्या नोटिसा नागरिकांना प्राप्त झाल्या आहेत. नोटिशीवर दि. २८ नोव्हेंबर २०१३ अशी तारीख असून, ती नागरिकांच्या हातात तक्रारींसाठी अखेरचे दहा दिवस शिल्लक राहिल्यावर देण्यात आलेली आहे.
प्रस्तावित भाडेवाढ करताना त्याची कुठेही वाच्यता झालेली नाही. अशा गोष्टींची पालिकेच्या सभेत चर्चा केली जात नाही. वास्तविक वर्तमानपत्रांमधून तशा सूचना देऊन किंबहुना या विषयांवर जनमत घेऊन लोकांचे मत जाणून घेऊन असे मोठे निर्णय घेण्याची आवश्यकता होती, परंतु, पालिका प्रशासन नागरिकांना जाणूनबुजून अंधारात ठेवण्याचे काम करत आहे. संकलित कर गोळा करायला आमचा विरोध नाही, कारण मिळणा-या या करामुळे शहराचा विकास होतो याची जाणीव आम्हाला आहे. मात्र, इतकी वष्रे संकलित कर देऊनही शहरातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण यांचा उडालेला बोजवारा आम्ही पाहात आहोत. पालिकेच्या बैठकीत विरोधी नगरसेवकांची जाणूनबुजून मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका निवेदनात करण्यात आली आहे.