जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजित बहुमजली इमारतीचे भूमिपूजन उद्या प्रजासत्ताकदिनी (रविवार) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे. औरंगाबाद राज्यमार्गावर जुन्या प्रांत कार्यालयाच्या परिसरात ही आठमजली इमारत बांधण्यात येणार असून शहरातील ती सर्वात उंच इमारत ठरेल.
बांधकामाच्या नव्या निकषांनुसार ही अद्यावत इमारत बांधण्यात येणार असून त्यासाठी तब्बल २८ कोटी ५८ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. भूमिगत मजला आणि त्यावरील स्टील्ट मजल्यावर मिळून तब्बल १३० चारचाकी वाहने बसतील असा भव्य वाहनतळ, त्यावर तळमजला अधिक पाच मजले अशी या इमारतीची रचना आहे. भूमिगत मजल्यापासून ही आठजमली इमारत आहे. सुमारे दीड लाख स्क्वेअरफूट (सुमारे चार एकर) बांधकाम करण्यात येणार आहे.
इंग्रजी ‘वाय’ आकाराप्रमाणे या इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. भव्य कॅरिडॉर आणि ४०० आसनक्षमतेचे सभागृह ही या इमारतीची वैशिष्ठय़े आहेत. इमारतीत सात लिफ्ट बसवण्यात येणार आहे. बांधकामला सुरूवात झाल्यानंतर तीन वर्षांत ही इमारत बांधण्याचे उद्दीष्ट असून त्यानुसार सन २०१७ पर्यंत इमारत पुर्ण होईल असे सूत्रांनी सांगितले. उद्या (रविवार) सयांकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते इमारतीचे भूमिपूजन होणार आहे.
ब्रिटीश काळापासून जिल्हाधिकारी कार्यालय शहरातील हातमपुरा परिसरात आहे. येथील बऱ्याचशा इमारती या मूळच्या बऱ्याकच आहेत. गेली किमान शंभर वर्षे येथेच जिल्हाधिकारी कार्यालय आहे. येथील काही इमारती आता जीर्ण झाल्या असून भविष्यातील गरज लक्षात घेऊन नवे जिल्हाधिकारी कार्यालय बांधण्यात येत आहे. महसुलमंत्री थोरात यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला होता.