शहरात गुरुवारी सकाळी साडेनऊ ते दहा या अध्र्याच तासाच्या कालावधीत विविध भागात सोनसाखळी चोरीच्या चार घटना घडल्या. बिबवेवाडी रस्ता, सदाशिव पेठ, नारायण पेठ व सहकारनगर या भागामध्ये या घटना घडल्या. या चार घटनांमध्ये चोरटय़ांनी तीन लाख ६२ हजार रुपयांचे दागिने पळवून नेले.
सदाशिव पेठेत राघवेंद्र मठाच्या मागील भागात सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडलेल्या घटनेत भानुशाली जयराम अय्यर (वय २६, रा. रास्ता पेठ) या देवदर्शन करून पायी जात असताना एक चोरटा त्यांच्या दिशेने आला. जवळ येताच त्याने अय्यर यांच्या गळ्यातील सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र सोनसाखळी तोडून पोबारा केला.
नारायण पेठेत लोखंडे तालमीजवळील सकाळी दहाच्या सुमारास घडलेल्या घटनेत वंदना गजानन पाटकर (वय ६०, रा. पद्मावती) या रस्त्यालगत उभ्या असताना दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावले.
बिबवेवाडी रस्त्यावर रासकर पॅलेससमोर शारदा वसंत काळे (वय ५३) यांच्या गळ्यातील मंगळसूत्राचा अर्धा भाग दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी पळवून नेला. सकाळी दहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेत ३७ हजार ५०० रुपयांचे सोने चोरटय़ांनी पळवून नेले. सहकारनगर भागात सकाळी साडेनऊच्या सुमारास अरण्येश्वर दर्शन सोसायटीजवळ सक्षा तेजपाल जैन (वय ६८) यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी हिसकावले.