स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या स्वा. सावरकर सेवा संस्था, ठाणे यांच्यातर्फे गेल्या दोन वर्षांपासून स्वा. सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. या संमेलनाचे यंदाचे तिसरे वर्ष असून २० एप्रिल २०१३ रोजी लंडनमध्ये यंदाचे स्वा. सावरकर विश्व संमेलन होणार असल्याची घोषणा गुरुवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. या पत्रकार परिषदेला सुप्रसिद्ध लेखक, इतिहासकार डॉ. सच्चिदानंद शेवडे, अभिनेते शरद पोंक्षे, संस्थेचे कोषाध्यक्ष सुशील कदम, सचिव श्रीनिवार जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. आतापर्यंत दोन संमेलने मॉरिशस व दुबई येथे झाली असून यंदा लंडनमध्ये होणाऱ्या तिसऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलनात स्वातंत्र्यवीरांच्या विचारांवर आधारित अनेक कार्यक्रम होणार आहेत. मुंबई-पुणे येथील दोन सांस्कृतिक संस्था या संमेलनात सावरकरांच्या विचारांवर आधारित कलाकृती सादर करणार आहेत. त्याचबरोबर ‘सावरकर : ज्ञात अज्ञात’ या डॉ. सच्चिदानंद शेवडे लिखित पुस्तकाचे तसेच स्वा. सावरकर यांच्यावरील लेख-छायाचित्रे स्मरणिकेचे प्रकाशनही लंडनच्या संमेलनात केले जाणार आहे.तिसऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलनाला भारतातून २५० व्यक्तींना घेऊन जाण्याचा मानस स्वा. सावरकर सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र कराडकर यांनी तर विश्व संमेलनाची रूपरेखा संस्थेचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी मांडली. स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी नागरिकांना या विश्व संमेलनाला उपस्थित राहण्याची इच्छा असल्यास इच्छुकांनी दीपक दळवी यांच्याशी ९८२०४४०८२१ या क्रमांकावर संपर्क साधावा.