गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्य़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे व जिल्ह्य़ातील पुरामुळे मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे. पूर परिस्थितीत संकट कोसळलेल्यांना  प्रशासनाच्या वतीने १ कोटी १२ लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.
सततच्या पावसामुळे जिल्ह्य़ात ठिकठिकाणी नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पडझडीच्या घटना घडल्या असून जिवित हानीही झाली. या बाधितांना तातडीची मदत म्हणून ठिकठिकाणी सानुग्रह अनुदानाचे वाटप सुरू आहे. जिल्ह्य़ात पूर परिस्थितीमुळे ४५२ पेक्षा जास्त गावे बाधित झाली. याची संख्या १५ हजारावर असून कुटुंबांची संख्या १० हजारावर आहे. पूर परिस्थितीत २३ व्यक्ती मृत्युमूखी पडल्या असून लहान व मोठी, अशा एकूण ४१ जनावरे दगावली आहेत. जिल्ह्य़ात ७१४२ घरांचे नुकसान झाले आहे. त्यात अंशत ५२०९, तर पूर्णत १९५८ घरांचा समावेश आहे. अतिवृष्टीने ठिकठिकाणी शेतात पाणी साचल्याने व नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचेही नुकसान झाले असून त्यात जमिनीचे नुकसान ३०१३ हेक्टर, तर पिकांचे ६० हजार ८०५ हेक्टर नुकसान झाले आहे. जिल्ह्य़ातील  बाधितांना प्रती व्यक्ती हजार याप्रमाणे ११ हजार २०८ नागरिकांना १ कोटी १२ लाख ७०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. पूर परिस्थितीत मृत्यूमूखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख ५० हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्य़ात लहान ७, तर मोठी ३२ जनावरे दगावली असून त्यापोटी मालकांना दीड लाखाची मदत देण्यात आली आहे. जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणावर नुकसानीच्या सव्‍‌र्हेक्षणाचे काम सुरू आहे. सव्‍‌र्हेक्षणाअंती पात्र सर्वच  नुकसानग्रस्तांना ही मदत दिली जाणार आहे.