प्रवरा नदीवर लाख ते कान्हेगावच्या दरम्यान पुल बांधण्याचा प्रस्ताव मंजूर असला तरी राज्य सरकारकडे निधी नसल्याने तो पुल झाला नाही. पण आपण केंद्र सरकारकडून निधी मिळवून पुलाचे काम मार्गी लावू असे आश्वासन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले.
कान्हेगाव येथे संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचा १० लाख रुपये खर्चून जिर्णोद्धार करण्यात आला आहे. खासदार वाकचौरे यांच्या स्थानिक विकास निधीतून ४ लाख तर आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या निधीतून अडीच लाख रुपये खर्चून सभागृह बांधण्यात आले आहे. तसेच वाकचौरे यांच्या निधीतून हायमॅक्स दिवे बसविण्यात आले आहेत. तुकाराम बिजेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हरिनाम सप्ताह व सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, महंत रामगिरी महाराज, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मुरकुटे, सामाजिक कार्यकर्ते फ्रान्सिस संसारे, भाजपाचे तालुका सरचिटणीस बबन मुठे हे उपस्थित होते.
खासदार वाकचौरे म्हणाले, सभागृहांच्या कामाला निधी देण्यासाठी अनेकांनी विरोध केला. रस्ते, बंधारे आदी कामांसाठी निधी द्या पण सभागृहाला देऊ नका, असे अनेकांचे म्हणणे होते. पण आता आपण सभागृहाला निधी दिल्याने आता खूश आहोत. या कामात एक रुपयाचाही भ्रष्टाचार झाला नाही. सभागृह धार्मिक व सामाजिक कामांसाठी वापरले जाते. दररोज अबालवृद्धांचे गावक ऱ्यांचे ते संवादाचे ठिकाण बनले आहे. त्यामुळे माझ्यावर होणारी टीका व्यर्थ होती. हे सिद्ध झाले आहे, आता विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी कार्यक्रम घेतल्याचे ते म्हणाले.
आमदार कांबळे यांनी कान्हेगाव हे गेल्या ५० वर्षांपासून तंटामुक्त गाव आहे. मी कधी राजकारणातून या गावाकडे पाहात नाही. निवडणुका झाल्या की सर्वानी एकत्र आले पाहिजे. या गावात राजकारण सोडून लोक एकत्र येतात. सर्वच पक्षाचे नेते त्याचे अभिनंदन करतात. ही चळवळ साऱ्या तालुक्यात पोहचले पाहिजे. या गावात आता जलसंधारणाचे काम हाती घेण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. प्रवरा नदीपात्रात भूमिगत बंधारा बांधण्यासाठी तसेच आणखी एक सभागृह व रस्त्यासाठी निधी मिळवून देवू असे आश्वासन त्यांनी दिले.
आदिवासी समाजाच्या लक्ष्मीमाता मंदिरासमोरील सभागृहासाठी आमदार अरूण जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून अडीच लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासन सिद्धार्थ मुरकुटे यांनी दिले.
प्रारंभी उपसरपंच गिताराम खरात यांनी विविध कामांचा आढावा घेतला. महंत नारायणगिरी महाराज यांच्यामुळे गाव गेली ५० वर्ष तंटामुक्त आहे. नारायणगिरी महाराजांचा वारसा महंत रामगिरी यांनी चालवला आहे. आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली गाव आदर्श बनविले जाणार असल्याचे ते म्हणाले.