पित्याच्या पार्थिवावर अग्निसंस्कार विधी दोघा मुलींनी केला. राज्यात सावित्रीबाई फुले जयंती साजरी होत असतांना इचलकरंजीतील सावित्रीच्या लेकींनी हे पुरोगामी कृतीचे पाऊल गुरूवारी टाकले.
इचलकरंजी गावभागात सदानंद वसंत कदम हे राहत होते. प्रोसेसमध्ये काम करणारे कदम यांचे गुरूवारी सकाळी हदयविकाराच्या धक्क्य़ाने निधन झाले. ही माहिती मिळाल्यावर त्यांचे नातेवाईक, शेजारचे लोक अंत्यविधीसाठी जमले.
पंचगंगा नदीघाटावर कदम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती. कदम यांना दोन मुली असल्याने पार्थिवास अग्नी कोणी द्यायचा असा प्रश्न उपस्थित झाला. ही परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कन्या अमृता व नम्रता या दोघी पुढे झाल्या. पित्याला मुलाकडून वा मुलगा नसेल तर नातेवाइकाकडून अग्निसंस्कार करण्याची पध्दत आहे. मात्र अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेली नम्रता व बँकेत नोकरी करणारी अमृता या सुशिक्षित बहिणींनी पित्याच्या पार्थिवास अग्नी दिला. सावित्रीबाई फुले जयंतीदिनी या दोघींचे हे पुरोगामी पाऊल लक्षवेधी ठरले.