इचलकरंजी येथील सुतारमळय़ात पाच महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी घागर मोर्चा काढला. महात्मा गांधी चौकात पालिकेच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.    
गेली चार-पाच महिने शहरातील पाणीपुरवठा अपुरा व विस्कळीत होत आहे. सुतारमळय़ातही हे चित्र आहे. तेथे चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. कूपनलिकेला विद्युत मोटार नसल्याने पाण्याचा दाब कमी आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी किस्मत तरुण मंडळ व दिलावर म्हालदार यांच्या नेतृत्वाखाली घागर मोर्चा काढला. महात्मा गांधी पुतळय़ाच्या मध्य ठिकाणी निदर्शने केली. पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. घटनास्थळी नगराध्यक्ष सुप्रिया गोंदकर या आल्यानंतर त्यांना दलित सेनेचे दिलावर म्हालदार यांनी निवेदन देऊन चर्चा केली. गोंदकर यांनी कृष्णा नदीतून पाणीउपसा करणारा पंप बंद पडल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, आठवडय़ाभरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले.