महाराष्ट्रीयन पुढा-यांनी आतातरी नेभळटपणा, बोटचेपेपणा सोडावा व धाडसी भूमिका घेऊन बेळगावातील मराठी जनतेच्या मागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते किरण ठाकूर यांनी आज येथे केले.
नाशिक येथे कामासाठी जात असताना ठाकूर नगरमध्ये काही काळ थांबले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्राचा समर्थ पाठिंबा मिळत नसल्याबाबत खंत व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयात आता बेळगावसह महाराष्ट्राचा प्रश्न अंतिम टप्प्यात आहे. या वेळी महाराष्ट्राची खंबीर साथ हवी आहे असे ठाकूर म्हणाले. पंडित नेहरू यांनी काश्मीर, तिबेट व भाषावार प्रांतरचना या तीन हिमालयाएवढय़ा चुका करून ठेवल्या, त्याचा त्रास बेळगावकरांना भोगावा लागतो आहे अशी टीका ठाकूर यांनी केली.
लढवय्या महाराष्ट्र, पंजाब व बंगाल हे नेहरूंच्या डोळ्यांत खूपत होते, त्यामुळे त्यांनी या तिन्ही राज्यांचे तुकडे पाडले, मात्र त्यांच्यापेक्षा मोठे असलेल्या उत्तर प्रदेश, बिहार यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. गोवा, बेळगाव, कारवारसह एकत्र महाराष्ट्र ही देशातील फार मोठी शक्ती झाला असता व त्यांना ते नको होते. त्यांच्या त्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती गेली अनेक वर्षे लढा देत आहे. महाराष्ट्रातील पुढारी, नेते आम्ही तुमच्याबरोबर आहोत असे फक्त सांगतात, धाडसीपणे तशी एखादी कृती मात्र करताना ते दिसत नाही असे ठाकूर म्हणाले. जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष सुभाष गुंदेचा तसेच प्रकाश भंडारे, सतीश काणे आदींनी ठाकूर यांचा सत्कार केला. या वेळी अशोक झोटिंग तसेच अन्य पत्रकार, छायाचित्रकार उपस्थित होते.