आरं ये राम्या.. काय झाल ? कशाला वरडत आला ? इलेक्शन डिक्लेर झालं की काय, नाही म्हनलं त्याबिगर तुमा राजकारणी मंडळीस्नी  गरीब शेतकरी आठवतच नाय..
आरं त्ये मरू दे. ते नाय महत्वाचं. कवा कवा आमी राजकारणी मंडळी तुम्हा शेतकऱ्यांच्या कामी येतो. ते नाय म्हत्वाचं. माझं हे असंच असतं बघ. जायचं असतं नांदुरला अन् जाऊन पोहचतो नांदुरशिंगोटय़ाला. ते नाय म्हत्वाचं. आरं, तु इकडं बसला खुराडय़ात त्वांड घालून अन् तिकडे समदी मंडळी सोनं लुटून राहिली..
लुटून राहिली म्हंजी ? सामुहिक दरोडा टाकला की काय..
आरं दरोडा सामुहिकच असतो. ते नाय म्हत्वाचं. आरं येडय़ा, आतापावेतो जे नुस्तं वर जात व्हतं, ते आता खाली खाली येऊ लागलंय..
म्हंजी ? आरं, वर काय जात व्हतं. खाली काय येऊ लागलं. समदं माज्या पागोटय़ावरून गेलं बघ. जरा इस्कटून सांग नेमकं काय झालं..
तुला आता डायरेक्ट सांगून टाकतो. सोनं लई स्वस्त झालंया. तीसवरून डायरेक्ट सव्वीसवर आलंया. शहरातील समदी जणं सोनं घेऊ राहिली. म्या काय म्हन्तो. तु बी घेऊन टाक एक दोन किलो..
एक दोन किलो ? तुला सोनं म्हंजी गुळाची ढेप वाटली का सरकीची पेंड. आरं इथं आम्ही पाणी द्या, पाणी द्या म्हणून वरडतोय. ते देता येत नाय तुम्हास्नी अन् म्हनं सोनं घ्या..
आरं दुष्काळ काय समदीकडं हाय, म्हणूनशा कोणी जेवण सोडलंया. लगीनसराई सुरू झाली की तवा फटाके फोडाया, बॅण्डवर दोन दोन तास नाचाया, समदी तयार व्हतातच. दुष्काळ, दुष्काळ म्हणून काय बी व्हणार नाय..
असं म्हन्तो. मंग म्या काय करू सांग..
हांग अशी, आता कसं बोलला ? एक सॉलीड आयडिया हाय. ही समदी जमीन इकून टाक अन् सोनं घेऊन टाक. सोनं परत वर गेलं की सोनं इकून टाक..
अन् जमीन घेऊन टाक असंच ना..
नाय, नाय तसा यडपटपणा बिल्कूल नाय करायचा. तो पैका शेअरमध्ये टाकायचा..
कशामंदी टाकायचा..
शेअरमंदी. ही समदी बडी बडी मंडळी शेअरमंदी पैका टाकल्यानंच मोठी झालीया..
शहरात चकरा वाढल्यापास्नं तुजं जनरल नालेज चांगलंच वाढलंय की..
ते नाय म्हत्वाचं. म्या काय समजू. इकायची ना जमीन, घ्यायचं ना सोनं..
आरं, दुष्काळ पडला म्हणूनशा जमीन इकाया म्या काय तुला..
राम्या, मला वाटलंच व्हतं. तुला राग येणार. तुला नाय पटणार..
मंग आल्ताच कशाला? राजकारण्यांमंदी फिराया लागल्यापास्नं तु कवा पन टोपी बदलाया लागला. तुम्हा राजकारण्यांस्नी येवढाच जर शेतकऱ्यांचा पुळका असंल तर द्या म्हनावं आम्हास्नी दोन टाइमाला पाणी. पाण्याबिगर आमचं जितरब मरून पडाया लागलं. त्याची फिकीर नाय कोणाला अन् आम्हास्नी सोनं घ्याया सांगता..पुढाऱ्यास्नी भर दुपारचं मनमाड, नांदगाव, चांदवड, सिन्नर, सटाणा या भागात एक दोन तास पायी फिरून दाखवा म्हनावं अन् फिरताना त्या बाटल्यांमंदी असलेलं पाणी नको तर तो शेतकरी जे पाणी पिईल तेच पिऊन दाखवा. म्या म्हन्तू एक भी तयार नाय व्हनार..
आता मलाच कोरड पडाया लागली बघ. दे तुज्याकडचंचं पाणी दे..