सकाळी सातचा सुमार. अचानक मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांच्या कानी वेगळीच घोषणा ऐकू आली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ‘मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा’ या घोषणेपाठोपाठ सुरू झाले ‘लाभले भाग्य आम्हांस बोलतो मराठी’ हे गीत. काही काळ मुंबईच्या उपनगरी रेल्वे स्थानकावर आपण उभे आहोत की मराठी शाळेच्या प्रांगणात आहोत, हेच प्रवाशांना उमगत नव्हते. अर्थातच निमित्त होते कविवर्य कुसुमाग्रज जयंती ऊर्फ मराठी भाषा दिनाचे! रवींद्रनाथ टागोर यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशभर सर्वत्र सर्व रेल्वे स्थानकांवर रवींद्र संगीत वाजविण्यात आले होते. काही वर्षांपासून रेल्वेच्या वतीने असा संगीतमय नजराणा देण्याची प्रथा सुरू करण्यात आली आहे. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी देशभक्तीपर गीते लावण्यात येतात. तर महात्मा गांधी जयंतीनिमित्त महात्माजींची रामधून २ ऑक्टोबर रोजी लावण्यात येते. गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी दिवसभर मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर ‘महाराष्ट्र गीत’ वाजविण्यात आले होते. मग महाराष्ट्राची राज्यभाषा असलेल्या मराठी भाषेचा दिन साजरा होत असताना त्या भाषेमध्ये त्या दिवशी प्रवाशांना किमान शुभेच्छा मिळणे आवश्यक आहे, असा विचार करून महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने सहाय्यक महाव्यवस्थापक सत्यप्रकाश यांची भेट घेतली आणि बुधवारी, २७ फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मराठीतून शुभेच्छादर्शक उद्घोषणा कराव्यात, या मागणीचे निवेदन त्यांना दिले. सत्यप्रकाश यांनीही तात्काळ या शिष्टमंडळाकडे त्या गीताच्या ध्वनिमुद्रिकेची मागणी केली आणि हे गीत वाजविण्याचे आश्वासन दिले.  बुधवारी सकाळी ७पासून मध्य रेल्वेच्या सीएसटी ते इगतपुरी आणि लोणावळ्यापर्यंत सर्व स्थानकांवर दर एक तासाने केंद्रीय उद्घोषणा व्यवस्थेद्वारे मराठी भाषेचा गौरव करणारे गीत ऐकविण्याबरोबरच मराठी दिनाच्या शुभेच्छा सुरू झाल्या.
मराठीद्वेष्टी पश्चिम रेल्वे
मध्य रेल्वेवर अशा मराठी दिनाच्या शुभेच्छा देण्यात येत असताना पश्चिम रेल्वेवर मात्र तांत्रिक अडचणींचा पाढा वाचत तेथील अधिकाऱ्यांनी असे करण्यास विरोध दर्शविला. मध्य रेल्वेला दोन दिवसांपूर्वी पत्र देण्यात आल्यावरही त्यांनी तात्काळ त्यास संमती दिली. मात्र पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी एक आठवडा आधी पत्र द्यावयास हवे होते. त्या गीताची ध्वनिमुद्रिका तपासून मग त्याबाबत विचार करून निर्णय घेतला असता, असे सांगत आता हे शक्य नाही, असे सांगितले होते. गेल्या वर्षीही महाराष्ट्र दिनाच्या वेळी मराठीतून शुभेच्छा किंवा महाराष्ट्र गीत वाजविण्यास पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला होता.