महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणामुळे वीज, शेतीसह सिंचनासाठी पाणीपुरवठा होतो. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला आहे. परिणामी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने कोयना-कृष्णा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरण व्यवस्थापनाने योग्यवेळी पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने मोठय़ा पुराचा धोका नसला, तरी प्रशासनाने पुराबाबत दक्ष राहावे असे आवाहन महाराष्ट्राच्या जलसंपदा खात्याच्या प्रधान सचिव मालिनी शंकर अय्यर यांनी केले. कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, पर्जन्यमापकाचे प्रश्न याबाबत शासन स्तरावर विचार सुरू असल्याचे त्या म्हणाल्या.
मालिनी शंकर अय्यर यांनी कोयना धरणाच्या पाणीसाठय़ाचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्याबाबत उचित सूचना केल्या. अय्यर यांनी कोयना धरण परिसराची पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या वेळी कार्यकारी अभियांता एम. आय. धरणे, मुख्य अभियंता दीपक मोडक, एन. व्ही. शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख के. एम. एम. प्रसन्ना, आमदार नरेंद्र पाटील, सत्यजितसिंह पाटणकर उपस्थित होते.
कोयना धरण सुरक्षित असल्याची माहिती देताना पोलीस अधीक्षक प्रसन्ना म्हणाले, की कोयना धरणाच्या सुरक्षिततेसाठी ३१ ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असून, तीन अधिकारी ५० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी चोवीस तास दक्ष आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह प्रगत यंत्रणा सुरक्षाकामी कार्यरत आहे. ११ ठिकाणी बंदूकधारी पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत. आपण स्वत: कोयना धरण सुरक्षिततेबाबत लक्ष ठेवून आहे.
नरेंद्र पाटील, सत्यजितसिंह पाटणकर यांनी काही सूचना मांडताना पूराचा तडाखा बसणाऱ्यांना अर्थसाहाय्य मिळावे तसेच कोयना प्रकल्पग्रस्तांना आतातरी न्याय मिळावा अशी मागणी केली.