शिवसेना पक्षप्रमुख झाल्यानंतर उद्धव ठाकरे आपल्या राज्यातील संपर्काचा प्रारंभ दुष्काळी दौऱ्याच्या निमित्ताने जालना येथे ३ फेब्रुवारीला करणार आहेत. यानिमित्त आयोजित जाहीर सभेसाठी संपूर्ण मराठवाडय़ातून गर्दी व्हावी, या दृष्टीने पक्षपातळीवर नियोजन करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह मुंबईतील शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
रामदास कदम, सुभाष देसाई, दिवाकर रावते, संजय राऊत, अनिल देसाई, गजानन कीर्तीकर, नीलम गोऱ्हे आदी मुंबईतील नेतेमंडळी व लोकप्रतिनिधी, सेनेचे मराठवाडय़ातील खासदार-आमदार, स्थानिक संस्थांचे पदाधिकारी, पक्षसंघटनेचे प्रमुख पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. भाजपचे खासदार रावसाहेब दानवे, तसेच या पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही सभेला निमंत्रित केले आहे.सभेच्या पूर्वतयारीसाठी गेल्या १५ दिवसांपासून मराठवाडय़ातील सर्व जिल्हय़ांत सेनेचे स्थानिक पदाधिकारी दौरे करून बैठका घेत आहेत. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर दौरा असल्याने उद्धव ठाकरे त्याअनुषंगाने वक्तव्य करून ग्रामीण जनतेशी संवाद साधतील, तसेच दुष्काळ निवारण योजनांतील त्रुटी व सरकारकडून असलेल्या अपेक्षांबद्दल भाष्य करतील, अशी अपेक्षा आहे. जालना जिल्हा हा मराठवाडय़ातील दुष्काळाच्या सर्वात अधिक झळा बसणारा जिल्हा आहे. या जिल्हय़ातील सर्व ९७० गावांची खरिपाची अंतिम पैसेवारी पन्नासच्या आत आहे. मराठवाडय़ात जेवढी गावे ५०पेक्षा कमी पैसेवारीच्या आत आहेत, त्यातील ३० टक्के गावे एकटय़ा जालना जिल्हय़ातील आहेत. या सर्व पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे जालना दौऱ्यावर येत आहेत.
जालना बाजार समितीच्या परिसरात दुष्काळग्रस्तांच्या गुरांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या छावणीचे उद्घाटनही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दौऱ्यात होणार आहे. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे जालना बाजार समितीचे सभापती आहेत.