सिमेंट रस्त्याचे अर्धवट झालेले बांधकाम तर डांबरी रस्त्यावर पडलेले अनेक खड्डे, यामुळे शहराच्या मध्यभागातील ग्रेट नाग रोडचे रूपांतर ग्रेट खड्डे रोडमध्ये झाले आहे. खड्डय़ांमुळे नागरिक त्रासले आहेत.
पूर्व नागपुरातील व्यंकटेश कॉलनी ते धंतोली रेल्वे मार्गापर्यंतच्या रस्त्याला तीस-चाळीस वर्षांपूर्वी ग्रेट नाग रोड असे नाव देण्यात आले. शहराच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा हा रस्ता शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांपैकी एक आहे. १९८४मध्ये मध्यवर्ती बस स्थानक सुरू झाल्यानंतर या परिसराला महत्त्व प्राप्त झाले. या रस्त्यावरून बसेस, ट्रक आदी अवजड वाहनांसह तीनचाकी, चार चाकी व दुचाकींची वर्दळ वाढली. या रस्त्याच्या दुतर्फा मोकळ्या भूखंडांवर इमारती उभ्या झाल्या. व्यापारी प्रतिष्ठाने, रुग्णालये, महाविद्यालये, टेलिफोन एक्स्चेंज सुरू झाले. मध्यरात्रीनंतर दोन-तीन तासांचा अपवाद वगळता येथून वाहनांची सतत वाहतूक सुरू असते.
माजी आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात दुपदरी डांबरी रस्ते झाले. चकाचक डांबरी रस्ते, सिग्नल्स, रस्ते दुभाजक यामुळे खऱ्या अर्थाने या रस्त्याला ‘ग्रेट’पण आले. मात्र, अशोक चौक ते रेल्वे पूल तसेच रेल्वे पूल ते जगनाडे चौक या दोन्ही रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले आहेत. गेल्या महिन्यात हे खड्डे गिट्टी व डांबराने भरण्यात आल्याचे नागरिकांनी पाहिले होते. मात्र, पावसाने प्रशासनाचे पितळ उघडे पाडले. डांबर बेपत्ता झाले असून गिट्टी, खडी बाहेर पडून पावलोपावली खड्डय़ांचे दर्शन होतेच त्याबरोबर खड्डय़ातून गेल्याचा अनुभव नागरिकांना प्रत्यक्ष येतो. पाऊस पडत असताना खड्डय़ांमध्ये पाणी भरले असल्याचे ते दिसत नसले तरी खड्डय़ातून जात असल्याचे प्रत्येकालाच जाणवते. काही अंतर गेल्यानंतर प्रत्येकालाच थांबावे लागते आणि त्याचा हात पाठीवर आपसुकच जातो. कारण खड्डय़ांतून गेल्यामुळे त्याची पाठ दुखावली असते. ही अतिशयोक्ती नसून वास्तव आहे. खड्डय़ांमुळे नागरिक त्रासले आहेत. वाहनांचे नुकसान होतेच. त्यापेक्षा पाठ, कंबरदुखी वढली असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. या रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडी प्रशासनाच्या नावे शिव्याच बाहेर पडतात.
महापालिकेने दोन वर्षांपूर्वी ग्रेट नाग रोडचे सिमेंटीकरण करण्याची घोषणा केली. त्यासाठी कोटय़वधी रुपयांची तरतूदही करण्यात आली. ग्रेट नाग रोडच्या वैभवात आणखी भर पडेल, असे नागरिकांना वाटले होते. व्यंकटेशनगर ते जगनाडे चौक दुतर्फा तर जगनाडे चौक ते अशोक चौकापर्यंत एकेरी सिमेंटीकरण  झाले. मात्र, कंत्राटदाराने काम बंद केल्याने हे काम अर्धवटच राहिले.
सिमेंट रस्ता संपून डांबरी रस्ता सुरू होतो तेथे खड्डे वा उंचवटे झाले आहेत. नवे रस्ते तयार करण्यासाठी तसेच जुन्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी लाखो रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  
पावसाळा झाल्यानंतर नवे रस्ते तसेच जुन्या रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल, असे पालिका प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले. मुळात जकात बंद करून एप्रिल महिन्यापासून एलबीटीची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे त्याचप्रमाणे शासनाने मदतीस नकार दिल्याने उत्पन्न घटून महापालिकेची आर्थिक स्थिती खिळखिळी झाली आहे. वेतन उशिरा दिले जात आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांसाठी निधी उपलब्ध होणार कसा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. खड्डय़ापासून लवकर सुटका व्हावी, असे साकडे लोक मनोमन घालू लागले आहेत.
रस्त्यांच्या कामाची चौकशी करू -दटके
ग्रेट नाग रोडचे काम कंत्राटदारांनी कसे केले, याची चौकशी केली जाईल. सध्या पाऊस सुरू असल्याने या रोडचे काम करणे शक्य नाही. सिमेंट रोडचे काम मात्र सुरू आहे. या रस्त्यांच्या कामाबाबत कंत्राटदारांसोबत चर्चा करण्यात येईल, असे महापालिकेतील सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांनी सांगितले.