उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर सडकून टीका करीत शिवसेनेत नव्यानेच दाखल झालेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी ‘जुन्या’ जखमांची वेदना बुधवारी पुन्हा एकदा जोरदारपणे मांडली. भविष्यात आमचे सरकार आलेच, तर गृहमंत्री पाटील यांनाही ‘तसेच’ वागवू, असेही जाधव यांनी सुनावले.
युवा सेनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती. या सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरही ठाकरे यांनी टीका केली. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे मराठवाडय़ातील युवकांशी संवाद साधत आहेत. कन्नड येथे आयोजित जाहीर सभेच्या वेळी आमदार जाधव यांना बोलण्याची संधी मिळाली. पोलिसांकडून झालेली मारहाण कशी चुकीची होती, हे त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले. राज्यातील पोलीस आमदारांवर अन्याय करतात. त्यामुळे सर्वसामान्यांचे काही खरे नाही, असेही ते म्हणाले. मात्र, ‘त्या’ जखमांच्या वेदना सांगताना त्यांनी गृहमंत्री पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ‘सत्ता आली तर त्यांनाही फोडून काढू’, असे त्यांनीही सुनावले. त्यामुळे त्यांच्या भाषणाची शिवसेना कार्यकर्त्यांत मोठी चर्चा होती.
या भाषणाचा धागा पकडून आदित्य ठाकरेंनी गृहमंत्र्यांवर टीका केली. पोलिसांना मस्ती चढली आहे, असे ते म्हणाले. युवकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली. आदर्श प्रकरणात अडकलेले नेते काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी राज्याचे धोरण म्हणजे निष्क्रिय धोरण, अशी टीका त्यांनी केली. औरंगाबाद शहरातील संत तुकाराम नाटय़गृहातही त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.