दरवर्षी व्हॅलेंटाईन डे प्रेमाचे नवेनवे रंग घेऊन येतो. पूर्वी प्रेमपत्रे, प्रेमाचा संदेश लिहिलेली कार्ड्स, भेटवस्तूंवरच या ‘प्रेमरंगा’ची उधळण दिसायची.. आता, प्रेमाच्या रंगांनी हवादेखील रंगीली झाली आहे.. गाण्यातही प्रेम, आणि खाण्यातही प्रेम.. वेगवेगळ्या पध्दतीने होणाऱ्या या प्रेमरंगांची उधळण पाहून कुणा प्रेमवीरांचा  ‘जीव हा बावरा’ झाला नाही, तरच नवल!..
प्रेमाला वयाचं बंधन नसतं, हे ‘व्हॅलेंटाईन डे’चं ‘प्रेमतत्त्व’! या तत्वामुळेच, शहरातील शंभर वृध्द प्रेमी युगलांना उंच निळ्या आकाशात विहरत आपले प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. ‘इंडियन मीडिया लिंक’ या इव्हेंट कंपनीने या शंभर ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एक दिवस फक्त प्रेमाचा’ नावाने अनोखा इव्हेन्ट आखला आहे. म्हणजे, घरातून निघून एका मोकळ्या बसमधून काही तरूण जोडप्यांसह ही मंडळी ‘गेट वे’ला पोहोचतील. तिथे, ‘प्रेमकाव्यांच्या कश्तीत, लेहरांच्या मस्तीत’ नावाची एक आलिशान बोट या जोडप्यांच्या स्वागतासाठी सज्ज असेल. मग नाचणाऱ्या लाटांच्या मस्तीत, एकमेकांशी गुजगोष्टी झाल्यानंतर प्रत्येक जोडपं हेलिकॉप्टरमध्ये बसून मऊ मऊ ढगांच्या गादीवर पोहोचेल. तिथून मुंबईचे विहंगम दर्शन घेताना परस्परांच्या प्रेमाचा मोहोर          बहरेल..
ही झाली त्यांच्या प्रेमाची गोष्ट! तरुणाईसाठी, लाल रंगात रंगलेली, ‘तिच्या’ आणि ‘त्याच्या’ मनात दडलेल्या अनेक गोष्टींना शब्दरूप देणारी भेटकार्डे, भेटवस्तू, रंगीबेरंगी फु लांचे गुच्छ असा सगळा ‘प्रेमभरा’ माहौल आहे.
शिवाय, धिंगाणा म्युझिकपासून अनेकांनी ऑनलाईन प्रेमभरी गाणी ऐकवायचा विडा उचलला आहे. ‘इये ह्रदयीचे तिये हृदयी’ पोहोचवण्यासाठी तमाम रेडिओ जॉकी म्हणजे ‘आजचे प्रेमदूत’ तर या दिवसासाठी कार्यक्रम आणि गाण्यांची रेलचेल घेऊन सज्ज आहेत.
.. जिथे प्रेम आहे तिथे कधीतरी, कुठेतरी प्रेमभंगाचे दुखही आहे. आता जुने प्रेम मनातून निघत नाही म्हटल्यावर नव्याला जागा ती कुठे मिळणार? त्याचीही सोय या ‘ऑनलाईनच्या जगा’त झालेली आहे. तुमचा प्रेमभंग झाला आहे आणि त्या जुन्या प्रेमातल्या अनेक वस्तू अगदी पहिल्यांदा भेटलो तेव्हाच्या रेल्वे  तिकीटांपासून काहीही.. म्हणजे, अखेरचे भेटताना डोळे पुसरण्यासाठी वापरलेला रुमाल.. असे काहीही तुम्हाला विकता येणार आहे. म्हणजे या आठवणी जातील आणि त्यांना दामही मिळेल. प्रेमीजनांसाठी सगळीकडे पसरलेला हा प्रेमरस (की व्हायरस), ‘मन बावरे बावरे..’  करून सोडणार नाही तर काय?..