गर्भवती पत्नी व दोन मुलींचा जाळून खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या काशिनाथ परसप्पा रगटे (रा. कुरघोट, ता. दक्षिण सोलापूर) या शिक्षकाची जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. यावेळी न्यायालयाने आदेश देऊनही पोलीस गंभीर गुन्हय़ात सरकारी वकिलांना सहकार्य करीत नसल्याबद्दल नाराजी प्रकट केली.
आरोपी काशिनाथ रगटे यास दारूचे व्यसन होते. याच कारणावरून झालेल्या भांडणात त्याने आई यल्लव्वा रगटे, वडील परसप्पा रगटे व बहीण निर्मला राऊतराव यांच्या मदतीने गर्भवती पत्नी प्रभावती (वय २८) हिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यात प्रभावतीसह तिच्या पोटातील गर्भ व १ वर्षांची मुलगी शोभा यांचा मृत्यू झाला होता. मंद्रुप पोलीस ठाण्यात या गुन्हय़ाची नोंद होऊन आरोपींना अटक करण्यात आली होती. सोलापूरच्या सत्र न्यायालयाने आरोपी काशिनाथचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यावर त्याने उच्च न्यायालयात दाद मागितली.

सरकार पक्षाचा पुरावा हा मृत प्रभावती हिच्या मृत्यूपूर्व जबाबावर अवलंबून आहे. मात्र जबाब देताना प्रभावती ही शुध्दीवर असल्याबाबतचा वैद्यकीय अहवाल विसंगत आहे. ही बाब आरोपीतर्फे अ‍ॅड. रितेश थोबडे यांनी न्या. साधना जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावरून न्यायमूर्तीनी सरकार पक्षाला संपूर्ण वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सरकारी वकिलांनी अनेक वेळा सूचनापत्र पाठवून देखील पोलिसांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यावर न्यायमूर्तीनी पोलीस हे गंभीर गुन्हय़ात न्यायालयाने आदेश देऊनही त्यास प्रतिसाद देऊन सरकारी वकिलांना सहकार्य करीत नसल्याची बाब गृहखात्याला कळविली आहे. पोलीस खाते न्यायालयाच्या आदेशाची दखल घेत नसल्यामुळे खून, बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्हय़ात आरोपींना जामीन मंजूर करावा लागतो, अशा शब्दांत पोलिसांच्या निष्क्रियतेवर न्यायमूर्तीने ताशेरे ओढत आरोपी काशिनाथ यास १५ हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे अ‍ॅड. रितेश थोबडे यांच्यासह अ‍ॅड. पी. एल. सारडा व अ‍ॅड. राजकुमार मात्रे तर सरकारतर्फे अ‍ॅड. पी. पी. शिंदे यांनी काम पाहिले.