हायटेक ‘वेब बेस्ड’ पार्किंगसाठी मुंबईकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ही पद्धत सुरू झाली की वाहनतळावरील ठेकेदार किंवा त्यांच्या माणसांकडून शुल्क घेण्यासाठीच्या मनमानीला चाप बसण्यास मदत होणार आहे. या नव्या पद्धतीत वाहन चालकांना वाहनतळावर वाहन उभे करण्यासाठी ऑनलाइन नोंदणीही करता येणार आहे.
शहर आणि उपनगरांतील ९३ वाहन तळांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या नव्या पद्धतीमुळे वाहनतळांवर उभे करण्यात येणारे प्रत्येक वाहन आणि त्या वाहनचालकाकडून वसूल केलेले शुल्क यांची नोंद नियंत्रण कक्षातही केली जाणार आहे. वाहनतळाचा ठेकेदार आणि वाहनचालक यांच्यात शुल्कावरून नेहमी खटके उडतात. निर्धारित शुल्कापेक्षा जास्त शुल्क वसूल केले जात असल्याच्या तक्रारी नेहमीच केल्या जातात. आजवर हा सर्व कारभार कंत्राटी पद्धतीने ठेकेदारांकडून चालविण्यात येतो. मात्र या तक्रारींनंतर महापालिका प्रशासनाने वाहनतळांवर शुल्कवसुलीचे काम आपल्याकडे घ्यायचे ठरविले आहे. त्यानुसार पावती देण्याची पद्धत बंद करून ‘वेब बेस्ड’ पार्किंग ही नवी पद्धत सुरू केली जाणार आहे.
या नव्या पद्धतीच्या अंमलबजावणीचे कंत्राट मे. जिओडेसिक कंपनीला देण्यात आले आहे. सुरुवातीला या कंपनीकडून वाहनतळांवरील कर्मचाऱ्यांना ६०० यंत्रे देण्यात येणार आहेत. या यंत्रांवर वाहनतळावर येणाऱ्या सर्व वाहनांची नोंदणी केली जाणार असून त्याचवेळेस ही सर्व माहिती नियंत्रण कक्षातही पाहता येणार आहे. वाहनतळावरील कर्मचाऱ्यांकडच्या यंत्रावर वाहनाचा प्रकार, क्रमांक, वाहन किती वाजता आले त्याची नोंद, वाहन जाताना निश्चित दरानुसारच शुल्क वसूल केले जाते आहे किंवा नाही आदी सर्व माहिती नोंदली जाणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही यंत्रणा खूप उपयुक्त ठरणार आहे.
अतिरिक्त महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी या नव्या ‘वेब बेस्ड’ पार्किंग पद्धतीचे सादरीकरण स्थायी समिती सदस्यांपुढे केले होते. ‘वेब बेस्ड’ पार्किंगबाबतच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीत मंजुरी मिळाली असून येत्या महिन्याभरात ही योजना सुरू होईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले. ९३ ठिकाणी असलेल्या वाहनतळांबरोबरच प्रभाग पातळीवर ४५ ठिकाणी ही योजना सुरू केली जाणार असल्याचेही शेवाळे म्हणाले.
१ शहर आणि उपनगरातील ९३ वाहन तळ निश्चित
१ ऑनलाईन ही नोंदणी करता येणार
१ शुल्क वसूल करण्यावरून होणारे वाद टळणार
१ वाहनतळावरील मनमानी शुल्क वसुलीलाही बसणार आळा
१ खास नियंत्रण कक्षातही वाहनतळावरील वाहनांची होणार नोंद
१ ६०० यंत्रांसाठी मोजावे लागणार ६ लाख ८४ हजार रुपये