हिंदीतील थोर साहित्यिक मुन्शी प्रेमचंद आणि उदय प्रकाश यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘बडे भाईसाब’ आणि ‘तिरिछ’ या दोन कथांचे नाटय़ रूपांतर पाहण्याची संधी नाशिककरांना मुंबई येथील इंटरसिटी क्रिएशन्स आणि मंच मुंबई या संस्थांच्या वतीने उपलब्ध झाली आहे. शनिवारी रात्री नऊ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात हे प्रयोग होणार असून यापैकी एक गंभीर तर एक विनोदी आहे.
उदय प्रकाश लिखित तिरिछ ही कथा गावातील वातावरण, अंधश्रध्देचा पगडा, भावभावना अशा विविध वैशिष्टय़ांना स्पर्श करून जाते. गावातील मुक्त वातावरणातील व्यक्तीची शहरात कशी घूसमट होते, त्याचे वर्णन या कथेत आहे. तिरिछ हे एका विंचवासारख्या दिसणाऱ्या प्राण्याचे नाव आहे. या प्राण्याची मुलाच्या मनात निर्माण झालेली भीती आणि हाच प्राणी चावल्यानंतर गावातून शहरात नेण्यात आलेल्या त्याच्या वडिलांचा चोवीस तासात झालेला मृत्यू, याचे भयावह व्दंव्दा हिंदी नाटय़सृष्टीतील युवा प्रतिभावंत कलाकार अंशु सिंगने एकपात्री प्रयोगातून सादर केले आहे.
शहरातील धकाधकीच्या जीवनात मानवी स्वभावांमध्ये झालेले बदल यांवरही या प्रयोगाव्दारे प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. आतापर्यंत तिरिछचे १४ प्रयोग झाले असून याआधी नाशिकमध्ये दोन प्रयोग झाले आहेत. मुंबईत अंशुने तिरिछचे अधिक प्रयोग केले आहेत. अंशुच्या अभिनयाची ताकद या प्रयोगातून दिसून येत असून मुंबईतील ‘जयदेव रंग संवाद’च्या कार्यक्रमात तर प्रेक्षकांच्या आग्रहास्तव तिरिछचा पुन्हा प्रयोग ठेवावा लागला होता.
अंशु सिंग हे नाव नाशिककर नाटय़प्रेमींना नवीन नाही. वेगवेगळ्या नाटय़विषयक घडामोडींच्या माध्यमातून हे नाव नाटय़प्रेमींना परिचीत आहे. मुंबई बॉम्बस्फोटाच्या पाश्र्वभूमीवर सुहास पारवे दिग्दर्शित ‘व्हेअर आर यू?’ या नि:शब्द लघुपटात अंशुने साकारलेला अभिनय सर्वांच्या पसंतीस उतरला होता. याशिवाय डिसेंबर २०११ मध्ये दिल्लीमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय बाल नाटय़ महोत्सवात अंशु सिंग दिग्दर्शित व लिखित ‘चष्मा लगाओ और फिर देखो यारो’ हे नाटक उत्कृष्ठ ठरले होते. नाशिकच्या तिडके कॉलनीतील सेंट फ्रान्सिस स्कुलच्या विद्यार्थ्यांचा या नाटकात सहभाग होता.
मुन्शी प्रेमचंद यांनी ज्या अजरामर साहित्य कृती लिहिल्या, त्यापैकी बडे भाईसाब ही एक होय. तिरिछपेक्षा अगदी वेगळ्या धाटणीची, नर्म विनोदी संवादांच्या हलक्याफुलक्या अशा या साहित्य कृतीत अंशु सिंगच्या जोडीला अजय जयराम हा कलाकार आहे. गावातून शहरातील होस्टेलमध्ये राहणाऱ्या दोन भावंडांची कथा बडे भाईसाबमध्ये मांडण्यात आली आहे. बडे भाईसाब अत्यंत अभ्यासप्रिय व्यक्तीमत्व तर छोटे भाईसाब अगदी विरूध्द स्वभावाचा, तरीही दरवर्षी उत्तीर्ण होणारा. अभ्यासात हार पत्करलेले बडे भाईसाब शेवटी अनुभवाच्या आधारे आपले मोठेपण शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करतात. दोन भिन्न प्रवृत्तींचे चित्रण मुन्शीजींनी या कृतीव्दारे रेखाटले आहे. या प्रयोगाचे दिग्दर्शन विजयकुमार यांनी केले असून प्रकाश व्यवस्था बाळकृष्ण तिडके यांनी सांभाळली आहे. नाशिकमध्ये हिंदी रंगभूमीच्या चळवळीस प्रोत्साहन देण्यासाठी नाटय़ रसिकांनी मोठय़ा संख्येने या प्रयोगांचा आस्वाद घेण्याचे आवाहन अंशु सिंग आणि अजय जयराम यांनी केले आहे.