शहर परिसरातील विविध सामाजिक संस्था, विद्यालय तसेच राजकीय पक्षांच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांना जयंती व लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले.
बहुजन स्वराज महासंघ
बहुजन स्वराज महासंघाच्या वतीने संस्थापक प्रमोद नाथेकर यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारत जोडो चळवळ व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णा भाऊंनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे नाथेकर यांनी सांगितले. इतिहासाच्या पानावर ठसा उमटविणारे ते क्रांतिकारी साहित्यिक होते. ब्रिटिशांनी अण्णा भाऊंना पकडण्याचे आदेश दिले होते. अशाही परिस्थितीत त्यांनी भूमिगत राहून कार्य केले. त्यांच्या कार्याचा नागरिकांनी आदर्श घ्यावा असे आवाहन नाथेकर यांनी केले. कार्यक्रमास विश्वास कांबळे, सचिन बांडे, धर्मराज काथवटे, अविनाश आहेर आदी मान्यवर उपस्थित होते. सुभाष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
पंचवटीतही अण्णा भाऊ साठे जयंती
शहरातील भटके विमुक्त दलित आदिवासी ओबीसी समाज सेवा समितीच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांची जयंती पंचवटीतील विडी कामगारनगरात साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधत समितीचे रतन सांगळे यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीविषयी मार्गदर्शन केले. व्यसनामुळे मागासवर्गीय समाज हालअपेष्टा सहन करत असल्याचे त्यांनी सांगितले. समितीच्या वतीने कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यकर्त्यांना रोपांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मांगुलाल जाधव, भीमा काळे, सोमनाथ मोहिते, विनोद सरोदे, गिरीजा चोथे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय
रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे सरचिटणीस हेमंत वाघ यांनी प्रतिमा पूजन केले. तसेच पाचवीच्या विद्यार्थिनींनी टिळक व साठे यांच्या कार्याचा परिचय करून दिला. मुख्याध्यापिका ज्योती गटकळ व पर्यवेक्षक संजय शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सुनीता काकड यांनी सूत्रसंचालन ,प्रवीण बोडके यांनी आभार मानले.
सुभाष वाचनालय
जुने नाशिक परिसरातील सुभाष सार्वजनिक वाचनालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम डॉ. राजश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी बाजीराव सोनवणे होते. यावेळी डॉ. पाटील यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क असल्याची भीमगर्जना करणारे भारतीय स्वातंत्र्याचे जनक लोकमान्य टिळक व संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात जनजागृती करणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे ही माणसे अंगी जिद्द बाळगणारी होती. डॉ. पाटील यांनी सूरजसिंग गिरासे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाचनालयास ५०१ रुपयांची देणगी दिली. कार्यक्रमास विश्वस्त रामदास सोनवणे, चित्रकार नारायण चुंभळे, पोपट गोळेसर, दिलीप तांबे, सुनीता वाघचौरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप कार्यालय
भाजपच्या वतीने पक्ष कार्यालयात अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सावजी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. अन्याय व अत्याचाराच्या विरोधात सतत संघर्ष करून दीनदलित कष्टकरी मजुरांना न्याय मिळवून देणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी अर्पित केले. कथा, कादंबरी, पोवाडे, गीते, लावण्या, चित्रपट आदी विविध क्षेत्रात अण्णा भाऊंनी महान कार्य केले आहे. लेखणीच्या माध्यमातून त्यांनी मांडलेले ज्वलंत विचार आपण समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले. यावेळी उपमहापौर सतीश कुलकर्णी, सुरेशअण्णा पाटील, बाळासाहेब सानप, सुनील केदार, महेश हिरे, कुणाल गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. दीपक शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले.
आयटक कामगार केंद्र
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी माकप जिल्हा सचिव राजू देसले यांच्या हस्ते आयटक कामगार केंद्रात आयोजित कार्यक्रमात अण्णा भाऊ साठे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. साठे यांचे जीवन व साहित्य गावकुसाबाहेरील प्रत्येक माणसाच्या वेदना आहेत. अण्णा भाऊंनी साहित्यात सर्वसामान्य कुटुंबातील नायक उभा केला. शाहिरीतून चळवळ व प्रबोधन केले. त्यांचे विचार व साहित्य नवपिढीला प्रेरणादायी राहतील असे देसले यांनी नमूद केले. आगामी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन ठाणे येथे होत आहे. ते यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक दत्तू तुपे यांनी केले. यावेळी निवृत्ती कसबे, सतीश नवले, अ‍ॅड. राजपाल शिंदे, भास्कर शिंदे आदी उपस्थित होते.