काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सामना करणाऱ्या नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या तापमानाचा पारा झपाटय़ाने वर झेपावला आहे. वातावरणात अकस्मात हे बदल होत असताना टळटळीत ऊन आणि कमालीचा उकाडा या कोंडीत सापडलेल्या सर्वसामान्यांना पाणी टंचाई व वीज भारनियमनाचे चटके सोसावे लागत आहे. वाढत्या तापमानामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. उत्तर महाराष्ट्राने मार्चच्या अखेरीस हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद केली असून थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या नाशिकचा पारा ३८.८ अंशावर गेला असताना दुसरीकडे जळगाव जिल्हा ४० अंशाचा पल्ला ओलांडण्याच्या मार्गावर आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात नाशिकप्रमाणे स्थिती आहे.
नाशिक व धुळे जिल्ह्याच्या तापमानात मागील २० ते २२ दिवसात कमालीचे बदल झाले. मार्चच्या सुरुवातीला सलग पाच दिवस पाऊस व गारपिटीचा मारा सहन करावा लागला. त्यावेळी तापमान बरेच खाली उतरले होते. हे संकट टळल्यानंतर तापमानाचा पारा वर चढू लागला. दहा ते बारा दिवसात तापमानात सुमारे १० अंशांची वाढ झाल्याचे लक्षात येते. एरवी मार्चमध्ये नाशिकचा पारा तापमानाची ही पातळी गाठते . यंदा तापमानात हळुवार वाढ झाली नसल्याने उन्हाचा तडाखा बसत आहे. वर चढणाऱ्या तापमानाने आतापर्यंतची कमाल पातळी गाठली असून प्रचंड उष्म्याने जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. राज्यात तापमानाची सर्वाधिक नोंद होणाऱ्या जळगाव जिल्ह्याचा ४० अंशापर्यंत चढला असून नाशिकमध्ये तापमान ४० अंशाकडे वाटचाल करत आहे. २७ मार्च रोजी नाशकात सर्वाधिक ३८.८ अंश सेल्सिअस इतक्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली तर धुळ्यात पारा जवळपास तितकाच आहे. मालेगाव, व नंदुरबार भागातील तापमान कमी-अधिक प्रमाणात हीच पातळी आहे.
संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात टळटळीत उन्हामुळे बहुतांश नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर न पडणे पसंत केले आहे. परिणामी, या काळात प्रमुख बाजारपेठा, रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे पहावयास मिळते. प्रमुख बाजारपेठांमधील व्यवहार पूर्णपणे थंडावतात. जळगावकरांना प्रारंभी फारशी न जाणवलेली उन्हाची झळ आता बसत आहे. वाढत्या तापमानाने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ नये याकरिता योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना वैद्यकीय तज्ज्ञांकडून केल्या जात आहेत. शासकीय रुग्णालयांत उष्माघात कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावरही होत आहे. उन्हाळी लागणे, डोळे येणे किंवा लाल होणे, तोंड येणे, हातापायाची आग होणे, मूळव्याध, अंगावर पित्त उभारणे, लघवीला जळजळ होणे अशा व्याधींना सामोरे जावे लागते आहे. या काळात शरीराबरोबर मनावरही विपरित परिणाम होतो. उन्हात बाहेर पडताना टोपी व गॉगलचा वापर करावा. बाहेरून घरात आल्यानंतर प्रथम गार पाण्याचे हात-पाय स्वच्छ धुणे आवश्यक आहे. लगेचच गार पाणी पिऊ नये. कारण, तसे केल्यास उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. वातानुकूलीत यंत्राचा कमीतकमी वापर करणे हितावह आहे. या यंत्रणेमुळे बाहेरील तापमान सहन करणे शरीराला जिकीरीचे ठरते. आहारात तिखट पदार्थ व दही टाळून दूध, तुपाचा वापर वाढविणे आवश्यक असल्याचे आयुर्वेद शास्त्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.
उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी वाळाची तावदाने, टोप्या, पंखे, तत्सम वस्तुंच्या विक्रीत वाढ झाली आहे. तसेच आईस्क्रिम, थंड पेय, कलिंगड यांची मागणी वधारली आहे. शहरी भागात फारसे वीज भारनियमन केले जात नसल्याने शहरवासीयांना उन्हाळा सुसह्य करण्याचा मार्ग उपलब्ध असला तरी ग्रामीण भागात मात्र नेमके उलट चित्र आहे. सलग १० ते १२ तासांच्या भारनियमनामुळे तप्त झळांचा सामना करणे जिकीरीचे ठरले आहे. मनमाडकरही दोनवेळच्या भारनियमनाने वैतागले आहेत. पत्र्यांची घरे व झोपडपट्टीधारक सामान्य नागरिकांना वाढत्या तापमानाची झळ अधिक सोसावी लागत आहे. रणरणत्या उन्हाचा परिणाम धरणांतील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढण्यात झाला असून त्यामुळे बहुतांश धरणातील पातळी दोन ते तीन दशलक्ष घनफूटने कमी होत आहे. उष्णतेच्या लाटेत बाष्पीभवनाचा वेग असाच कायम राहिल्यास जेथे मुळातच जलसाठा कमी आहे, ती धरणे पूर्णत: कोरडी पडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. यामुळे पाणी टंचाईचे संकट भीषण स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. मार्चच्या अखेरीस ३९ ते ४० अंशापर्यंत गेलेला पारा एप्रिल-मे महिन्यात कोणती उंची गाठणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.