घडय़ाळाच्या काटय़ांवर धावणारी आणि रेल्वे रुळांवर धडधडणारी मुंबईकरांची पावले नाताळ आणि ३१ डिसेंबरचे वेध लागल्याने मुंबईबाहेर पडू लागली आहेत. यंदा ३१ डिसेंबर सोमवारी आल्याने वर्षांच्या शेवटच्या दिवशी सुट्टी घेऊन २९ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत नवीन वर्षांचे स्वागत मुंबईबाहेर करण्याकडे अनेक मुंबईकरांचा ओढा आहे. त्यासाठी मुंबईकर शक्यतो मुंबईजवळच्या ठिकाणांना पसंती देत असून लोणावळा, गणपतीपुळे, अलिबाग, नागाव, अर्नाळा वगैरे ठिकाणची हॉटेले व कॉटेजेस हाउसफुल्ल झाली आहेत. या पर्यटनस्थळांवरील हॉटेल मालकांनी खोलीमागे ३०० ते ५०० रुपये दरवाढ केली आहे.
डेक्कन ओडिसी निघाली लेण्यांच्या वाटेवर
आलिशान प्रवासाचा आनंद व पर्यटनस्थळांना भेट यासाठी असलेली ‘डेक्कन ओडिसी’ ही गाडीही २२ डिसेंबरला मुंबईहून छोटय़ा टूरवर निघत आहे. मुंबईहून निघालेली ही गाडी औरंगाबाद, जळगाव, नाशिक असा दौरा करणार आहे. या प्रवासादरम्यान देवगिरीचा किल्ला, बीबी का मकबरा, वेरुळची लेणी, अजिंठय़ाची लेणी, नाशिकला पंचवटी अशा प्रसिद्ध ठिकाणांचे दर्शन घडवत २६ डिसेंबर रोजी मुंबईत परत येईल.