थंडी परतीच्या मार्गावर असतानाच जिल्ह्य़ाच्या उत्तर भागात गुरुवारी सायंकाळी वादळी वा-यासह पाऊस व गारपिटीने चांगलाच तडाखा दिला. अकोले, कोपरगावला जोरदार गारपीट झाली, तर संगमनेर व कोपरगाव तालुक्यात वादळी वा-यासह सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाला. या अवकाळी पावसाने शेतातील उभ्या पिकांचे विशेषत: फळबागांचे मोठे नुकसान झाले. तीनही तालुक्यांत वादळामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोसळल्याने सायंकाळी वीजपुरवठाही खंडित झाला.
 अकोले तालुक्याच्या पूर्व भागात अनेक गावांमध्ये आज सायंकाळी गारपीट झाली. काही गावांमध्ये वादळी पाऊस पडला. या गारपिटीसह झालेल्या बिगरमोसमी पावसामुळे कांदे, डाळिंब, गहू, टोमॅटो अशा पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. अकोले शहरातही जोरदार वावटळीमुळे काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या. त्यामुळे संध्याकाळपासून शहर अंधारात होते. तर झाडे पडल्यामुळे अकोले-संगमनेरची वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती.
सायंकाळी अचानक शहर आणि परिसरात पावसाळी वातावरण निर्माण होऊन दहा ते पंधरा मिनिटे वावटळ झाली. सर्व परिसर धुळीने झाकाळून गेला होता. कोल्हार-घोटी रस्त्यावर अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्यामुळे शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. शहरालगतच्या परखतपूर, वाशेरे, सुगाव, कळस, मनोहरपूर, कुंभेफळ परिसरात जोरदार गारपीट झाली. अनेक ठिकाणी शेतात मध्यम आकाराच्या गारांचा खच पडला होता. गारांमुळे कांदा, नव्यानेच टाकलेली टोमॅटोची रोपे भुईसपाट झाली. गव्हाच्या पिकाने लोळण घेतले. डाळिंब पिकालाही फटका बसला. आढळा परिसरातील गणोरे, डोंगरगाव, हिवरगाव परिसरातही कमीअधिक प्रमाणात गारा पडल्या. तालुक्याच्या दक्षिण भागात बेलापूर, ब्राह्मणवाडय़ापासून कोतुळपर्यंत सुमारे तासभर मुसळधार पाऊस पडला. अकोले-संगमनेर रस्त्यावर सुगाव परिसरात दोन ठिकाणी झाडे पडल्यामुळे वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.
संगमनेर व कोपरगाव तालुक्यांतही सायंकाळी अंधार पडतानाच वादळी पावसाने झोडपून काढले. वादळाचा तडाखा मोठा असल्याने पिकांचे तसेच अन्य नुकसानही मोठय़ा प्रमाणावर झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वादळाने या तालुक्यांमधील वीजपुरवठा तसेच दूरध्वनी सेवाही विस्कळीत झाली.