अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान एक लाख रुपये निवृत्ती मानधन तसेच मानधनात वाढ करण्याचे आश्वासन महिला व बालकल्याणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिले आहे. या आश्वासनानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तीन दिवसांपासून सुरू असणारे साखळी उपोषण गुरुवारी मागे घेण्यात आले. मात्र शासनाकडून यासंदर्भात प्रत्यक्ष लेखी मिळेपर्यंत संप सुरूच राहणार आहे. याच मागणीसाठी २९ जानेवारी रोजी मंत्रालयावर राज्यव्यापी मोर्चा नेण्यात येणार आहे.
मानधनाऐवजी वेतन तसेच निवृत्तिवेतन मिळावे यासाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दि. ६ जानेवारीपासून संप सुरू आहे. शासनाने संपाची योग्य दखल न घेतल्याने तीन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी साखळी उपोषणही सुरू करण्यात आले होते. आज मुंबई येथे महिला व बालकल्याणमंत्री वर्षां गायकवाड यांच्याबरोबर अंगणवाडी कृती समितीची बैठक झाली. या बैठकीत किमान एक लाख रुपये निवृत्ती मानधन तसेच मानधनात वाढ करण्याचे आश्वासन गायकवाड यांनी दिले अशी माहिती डॉ. अजित नवले व गणेश ताजणे यांनी दिली.
सर्वात वयोवृद्ध अंगणवाडी कर्मचारीमहाले यांना पोलीस निरीक्षक उत्तमराव शेळके यांनी घास भरवून तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी भाजीभाकरीचा आस्वाद घेत उपोषणाची सांगता केली. तत्पूर्वी शहरातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घोषणा देत रॅली काढली. मंत्र्यांनी आश्वासन दिले असले तरी जोपर्यंत शासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्यात येणार आहे.