कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढविणार असल्याची घोषणा बुधवारी भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी वाढदिवशीच जाहीर केली.  सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या संभाव्य यादीमध्ये माझ्या नावाचा समावेश असला तरी निवडणूक कोणत्या पक्षाचा झेंडा घेऊन लढवायची हे अद्याप निश्चित केलेले नाही. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होताच याबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याचे महाडिक यांनी जाहीर केले.
गेल्या कांही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षाकडून धनंजय महाडिक यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचे सूतोवाच होत आहे. तर, गत महिन्यात जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयात केंद्रीय निरीक्षक आल्यानंतर धनंजय महाडिक यांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची इच्छा व्यक्त केली होती. या पाश्र्वभूमीवर महाडिक यांची निश्चित भूमिका काय याबाबत त्यांच्या समर्थकांत व नागरिकांत संभ्रमाचे वातावरण होते. दिवसभर वाढदिवसाच्या कार्यक्रमात व्यस्त असलेल्या महाडिक यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.     
महाडिक यांनी लोकसभा व विधासभा निवडणुकीतील बऱ्यावाईट प्रसंगांची माहिती देऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,‘‘२००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. तेंव्हा १३ हजार मतांनी पराभव झाला होता. पराभवाने न खचता पद व सत्ता नसतांनाही विधायक उपक्रम सुरूच ठेवले. सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माझी उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती. मात्र जिल्ह्यातील कांही नेत्यांनी खोडा घातल्याने उमेदवारी मिळू शकली नाही. माझ्यावर अन्याय होऊनही पक्षकार्य सुरूच ठेवले होते. त्यातूनच सोलापूर जिल्ह्य़ातील भीमा साखर कारखान्यात २२ वर्षांनंतर सत्ता परिवर्तन करण्यात यश मिळाले. या जिल्ह्य़ात महाडिक गटाचे जिल्हापरिषदेचे १२ व तालुका पंचायतीचे २७ सदस्य आहेत. महाडिक घराण्याच्या नावाखाली हे यश खेचून आणले आहे.’’     
‘‘आगामी लोकसभा निवडणूक मात्र मी निश्चितपणे लढविणार आहे. खासदार सदाशिवराव मंडलिक यांना आगामी निवडणूक लढवू नका, अशी विनंती करणार आहे. ते निवडणूक लढविणार असले तरी मी मात्र आता थांबणार नाही. मला मिळणाऱ्या माहितीनुसार सर्वच पक्ष माझ्या उमेदवारीबाबत आग्रही आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत पहिल्या क्रमांकावर, काँग्रेस पक्षाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर व शिवसेनेच्यायादीत तिसऱ्या क्रमांकावर संभाव्य उमेदवार म्हणून माझे नांव आहे. निवडणूक लढविण्यास परिस्थिती अनुकूल असल्याने आत्तापासूनच कार्यकर्त्यांची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. प्रत्यक्ष कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची हे निवडणुकीच्या अगोदर कांही दिवस जाहीर करणार आहे,’’ असे महाडिक म्हणाले.    
महाडिक यांनी आपले कट्टर प्रतिस्पर्धी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना टीकेचे लक्ष्य करतांनात्यांच्याशी राजकीय शत्रुत्व कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, निवडून आल्यापासून सतेज पाटील यांनी कोल्हापूरचे कोणतेही प्रश्न सोडविलेले नाहीत. थेट पाणी योजना, विमानतळ यासह अन्य प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना अपयश आलेले आहे. त्यांच्या पाठबळानेच जिल्ह्य़ात मटका फोफावत आहे. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना प्रखरपणे विरोध केला जाणार आहे. चंदगड पोटनिवडणुकीमध्ये कुपेकर गटाची जी व्यक्ती उमेदवार असेल त्यामागे महाडिक गटाची ताकद उभी केली जाणार आहे, असेही महाडिक यांनी या वेळी सांगितले.