डॉ. अपूर्व हिरे मित्र मंडळाच्यावतीने विभागातील गुणवंत शिक्षकांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची बुधवारी घोषणा करण्यात आली असून त्यात शिक्षण व सहकार महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे नाशिक विभागीय शिक्षकरत्न पुरस्कारासाठी धुळ्याच्या एसएसव्हीपीएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश नंदन तर पुष्पाताई हिरे नाशिक विभागीय महिलारत्न पुरस्कारासाठी एचपीटी महाविद्यालयातील पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या प्रमुख प्रा. डॉ. वृंदा भार्गवे तर समाजश्री प्रशांतदादा हिरे आदर्श संशोधक पुरस्कारासाठी नांदगाव महाविद्यालयातील प्रा. डॉ. हिरालाल जैन यांची निवड झाली आहे.
नाशिक विभागीय गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे आयोजन प्रथमच करण्यात आले असून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अपूर्व हिरे यांनी बुधवारी त्यांची पत्रकार परिषदेत घोषणा केली. या पुरस्कारांचे वितरण रविवारी सकाळी दहाला सावरकरनगर येथील शगुन सभागृहात होणार आहे.
तीन विभागीय पुरस्कारांबरोबर तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी ५९ जणांची तर लोकनेते व्यंकटराव हिरे नाशिक जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी तीन जणांची निवड करण्यात आली आहे. या शिवाय, प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक याप्रमाणे पाच तर प्रत्येक जिल्ह्यातील निवृत्त शिक्षकांमधून एक याप्रमाणे पाच जणांची अण्णासाहेब शिंदे जिल्हा सेवानिवृत्त पुरस्कासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच शहीद शिरीषकुमार मेहता नंदुरबार जिल्हा, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील अहमदनगर जिल्हा, लोकसेवक मधुकरराव चौधरी जळगाव जिल्हा, अण्णासाहेब चुडामण आनंदा पाटील धुळे जिल्हा असे प्रत्येक जिल्ह्यातून तीन पुरस्कार्थीची नांवेही यावेळी जाहीर करण्यात आली.
त्यात प्राथमिक शिक्षक ते पदव्युत्तर पदवी शिक्षकांमधून एक, संगीत व चित्रकला शिक्षकांमधून एक व क्रीडा शिक्षकांमधून एक तसेच नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व अहमदनगर या पाचही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार याप्रमाणे पुरस्कारार्थीची निवड करण्यात आली आहे.