सोलापूरच्या महापौर अलका राठोड यांच्या खासगी मालकीच्या निवासस्थानी बेकायदा बांधकाम झाल्याचे आढळून आले असून यात पालिकेच्या नगरअभियंता कार्यालयातील एका पथकाने महापौरांच्या निवासस्थानाच्या बांधकामाची पाहणी केल्यानंतर हे बांधकाम बिगरपरवाना असल्याचा अहवाल पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे सादर केला. यासंदर्भात अधिक चौकशीसाठी आयुक्तांनी तिघा अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत करून येत्या आठ दिवसांत अहवाल सादर करण्यास फर्मावले आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे महापौर राठोड यांचे नगरसेवकपद धोक्यात आल्याचे मानले जात आहे.
शहरातील जवाहर नगरात महापौर अलका राठोड व त्यांचे कुटुंबीय राहते. त्यांच्या निवासस्थानी वरच्या मजल्याचे बांधकाम बिगर परवाना झाल्याची तक्रार पालिका आयुक्त गुडेवार यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी चौकशीचे आदेश दिले असता नगर अभियंता विभागातील प्रभारी गंगाधर दुलंगे यांच्यासह अभियंता दीपक भादुले व कनिष्ठ अभियंता व्ही. बी. जोशी यांच्या पथकाने महापौरांच्या निवासस्थानाच्या बांधकामाची पाहणी केली असता त्यात बिगरपरवाना बांधकाम आढळून आले. या पथकाने प्राथमिक अहवाल आयुक्तांकडे सादर केला असता या प्रकरणाची अधिक चौकशी होण्यासाठी सहायक आयुक्त डॉ. पंकज जावळे, नगरअभियंता गंगाधर दुलंगे व अभियंता दीपक भादुले यांची चौकशी समिती गठीत केली आहे. या चौकशी समितीने या प्रकरणाची चौकशी करून आठ दिवसांत अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे आयुक्त गुडेवार यांनी स्पष्ट केले. जर महापौर राठोड यांच्या निवास्थानाचे बांधकाम बेकायदा असल्याचे अंतिम चौकशीतही सिद्ध झाल्यास कोणाचाही मुलाहिजा न ठेवता हे बांधकामावर पालिकेचा बुलडोझर फिरणार की दंडात्मक कारवाई करून हे बेकायदा बांधकाम नियमित केले जाणार, याकडे शहरवासीयांच्या नजरा वळल्या आहेत.
दरम्यान, महापौर अलका राठोड यांनी, आपल्या खासगी निवासस्थानातील बांधकामासाठी पालिकेत बांधकाम विभागाकडे परवाना मिळण्याकरिता रीतसर अर्ज केला असून तो प्रलंबित असल्याचे सांगितले. पालिकेच्या बांधकाम विभागाकडून परवाना मिळण्यापूर्वीच महापौरांनी घाई गडबडीत बांधकाम उरकल्याचे दिसून येते.