महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागातर्फे घोले रस्ता भागात गुरुवारी सुमारे दहा हजार चौरसफूट अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईत प्रामुख्याने हॉटेलचालकांनी मोकळ्या जागांवर केलेली बांधकामे पाडण्यात आली.
कार्यकारी अभियंता साहेबराव दांडगे तसेच उपअभियंता सी. जी. गायकवाड, कनिष्ठ अभियंता विठ्ठलराव इंगवले यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे कर्मचारी आणि वीस बिगारी सेवकांनी ही कारवाई पार पाडली. दोन जेसीबी, एक ब्रेकर आणि एक गॅसकटर या कारवाईसाठी वापरण्यात आला.
शिवाजीनगर घोले रस्ता येथील सिटी सर्वेक्षण क्रमांक ११९५ येथील हॉटेलच्या दर्शनी तसेच सामासिक अंतरातील अनधिकृत शेड कारवाईत पाडण्यात आले. हे पंधराशे चौरसफुटांचे बांधकाम होते. तसेच सिटी सर्वेक्षण क्रमांक ११९६ येथील पार्किंगच्या जागेत बांधण्यात आलेले अडीच हजार चौरसफुटांचे एका कंपनीचे कार्यालयही यावेळी पाडण्यात आले. तसेच याच जागेवर तळघरात आणि सामासिक अंतरात व पहिल्या मजल्यावर करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावरही यावेळी कारवाई करण्यात आली. यावेळी दोन हजार ३०० चौरसफूट बांधकाम पाडण्यात आले. सिटी सर्वेक्षण क्रमांक १२०१ येथील हॉटेलवरही कारवाई करण्यात आली असून दोन हजार चौरसफुटांची शेड यावेळी पाडण्यात आली. सिटी सर्वेक्षण क्रमांक १२२५ येथील अनधिकृत पोटमाळाही यावेळी पाडण्यात आला.