बिबळे घेणार मोकळा श्वास!
गेले अनेक महिने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबळे उद्यानाच्या हद्दीबाहेर येत असल्याच्या घटनांनी घबराट पसरली होती. मात्र मुळात बिबळ्या बाहेर येत नसून राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीवरच मानवाने केलेल्या अतिक्रमणामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आता राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेलगत असलेली अतिक्रमणे हटविण्याची एक जोरदार मोहीम उद्यानातर्फे हाती घेण्यात आली असून आजपर्यंत सुमारे १७०० अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.
ही अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात झाली की, अनेक राजकीय पक्ष आणि नेतेमंडळी पुढे सरसावतात, असा आजवरचा अनुभव आहे. त्याचाच प्रत्यय या खेपेसही उद्यानाच्या अधिकाऱ्यांना आला. मात्र उद्यानाचे हित लक्षात घेऊन या खेपेस कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमणविरोधी मोहीम थांबवायची नाही, असा निश्चय अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यानुसार, सध्या ही मोहीम दररोज सुरूच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेली सात ते आठ वर्षे ही अतिक्रमित बांधकामे तशीच आहेत. आता गेल्या ३ डिसेंबरपासून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली असून महिनाअखेपर्यंत येथील सुमारे चार हजार अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, कारवाई सुरू आहे. आजपर्यंत एकूण १७६८ अतिक्रमित बांधकामे हटविण्यात आली आहेत. यात संजय नगर, आंबेडकर नगर, जमऋषी नगर, मालाडचा अप्पापाडा आदींचा समावेश आहे.
या मोहिमेसाठी स्थानिक पोलिसांचीही चांगली मदत होत असून राखीव सुरक्षा दलाच्या तुकडय़ाही विशेष संरक्षण म्हणून तैनात करण्यात आल्या आहेत, असे सांगून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक व प्रमुख वनसंरक्षक सुनील लिमये म्हणाले की, गेल्या सात ते आठ वर्षांपासून ही अतिक्रमित बांधकामे हळूहळू पक्की होत चालली होती. राष्ट्रीय उद्यानाच्या दृष्टीनेच नव्हे तर आतील प्राणी आणि बाहेर असलेले मुंबईकर या सर्वाच्याच दृष्टीने उद्यानाची ही सीमारेखा मोकळी असणे गरजेचे आहे. ते राखण्यात यश आले तर मनुष्य आणि प्राणी संघर्ष होणार नाही, त्याचे प्रमाणही कमी होईल. सध्या बिबळ्या बाहेर येत असल्याच्या वृत्तामुळे अनेक जण चिंता व्यक्त करतात. पण मुळात तो बाहेर येत नसून त्याच्या म्हणजे उद्यानाच्या जमिनीवर अतिक्रमण झाले आहे, हे लक्षात घेणे सर्वाच्या दृष्टीने हिताचे आहे. म्हणूनच या अतिक्रमणविरोधी मोहिमेलाही महत्त्व आहे, असेही लिमये म्हणाले.