राज्यात सर्वत्र दुष्काळ असतानाही माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी राबविलेल्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेमुळे जिल्हय़ातील इतर तालुक्यांच्या तुलनेत श्रीरामपूर तालुक्याची पाणीपातळी चांगली असल्याचे मत पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले जल व भुमीसंधारण अभियानांतर्गत लोकसहभागातून गाळ काढणे या विशेष मोहीम कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी पाचपुते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार भानुदास मुरकुटे होते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती सुनिता गायकवाड, उपसभापती कैलास कणसे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सिध्दार्थ मुरकुटे, जि. प. सदस्य शरद नवले, प्रांताधिकारी सुहास मापारी, तहसीलदार अनिल पुरे आदी यावेळी उपस्थित होते.
पाचपुते म्हणाले, २०१२ सालापासून दुष्काळी परिस्थिती दरवर्षी येत असल्यामुळे पाण्याची पातळी वाढविणे या उद्देशाने जिल्हय़ातील विहिरी, तलाव, बंधारे यातील गाळ काढणे गरजेचे बनले आहे. या दृष्टीकोनातून गेल्या वर्षी तालुक्यातील सर्व विहिरी, तलाव, छोटी-मोठी बंधारे यामधन मोठय़ा प्रमाणात गाळ काढून पाण्याचे स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न केला. आता पाण्याचा प्राधान्यक्रम बदलला असून प्रथम पिण्यासाठी, नंतर शेती आणि मग उद्योगासाठी असा करण्यात आला आहे. चालू वर्षी ज्या ठिकाणी गाळ काढण्याचे काम बाकी आहे ते काम सद्यस्थितीत प्रगतीपथावर आहे. शेती महामंडळाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावाच्या गावठाणाचा प्रश्न सध्या महत्वाचा आहे. शेती महामंडळाची जमीन टिळकनगर, बेलापूर, हरेगाव व इतर गावाच्या गावठाणासाठी सोडविण्यासंदर्भात पाचपुते यांनी अधिकाऱ्यांना सुचना देऊन यासाठी दि. २३ मार्चला आढावा बैठक घेण्यास सांगितले.
जिल्हय़ात एकण ६ कोटी २० लाख घनमीटर गाळ काढला आहे. १९६० नंतर राज्यात मोठे पाझर तलाव, बंधारे झाली. विहिरींची मोठय़ा प्रमाणात निर्मिती झाली, मात्र यापैकी ६० ते ७० टक्के तलावास गळती लागली आहे. या तलावाची दुरूस्ती करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत पाचपुते यांनी व्यक्त केले.