लोकशाहीत मतभेद असतात, पण त्याचे रूपांतर एकमतात झाले पाहिजे. ते मनभेद, व्यक्तिभेद, व्यक्तिद्वेष आणि सुडाच्या राजकारणात होऊ नये, असे प्रतिपादन उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हार पवार केले.
श्रीरामपूर नगरपालिकेच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त आजी- माजी पदाधिका-यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या अध्यतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत ससाणे, पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, नगराध्यक्ष राजश्री ससाणे, उपनगराध्यक्ष दिलीप नागरे, पक्षप्रतोद संजय फंड, माजी सभापती नानासाहेब पवार, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, संजय छल्लारे उपस्थित होते.
पवार म्हणाले, बेलापूर गावचे स्टेशन ते औद्योगिक, व्यापारी शहर म्हणून झालेला श्रीरामपूरचा विकास लक्षवेधी आहे. येथे सहकार, उद्योग, व्यवसाय आहेत. जातिनिष्ठ, धर्मनिष्ठ राजकारणाच्या काळात सर्व जातिधर्माचे लोक येथे एकत्र राहतात, त्यामुळे या शहराचा उल्लेख ‘मिनी इंडिया’ करावासा वाटतो, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
लोकशाहीच्या संकल्पना दिवसेंदिवस बदलत आहेत. पन्नास वर्षांपूर्वी ज्यांना मेहरबान म्हणत असत त्यांना आता नगरसेवक म्हणतात. त्यामुळे निवडून गेलेल्या लोकांनी सभागृहे ही लोकशाहीची पवित्र मंदिरे आहेत आणि जनता आपले दैवत आहे, हे लक्षात ठेवावे, असा सल्ला पवार यांनी दिला. मतभेदाचे रूपांतर एकमतात करण्यात जयंत ससाणेंचा हातखंडा आहे. मंत्रालयात अडकलेल्या कामांचा पाठपुरावा करताना ते थकत नाहीत. त्यामुळेच ते सर्वाधिक निधी आणण्यात यशस्वी झाल्याचे सांगून त्यांच्या कामाचे कौतुक केले.
नगरसेवक मुजफ्फ़र शेख यांनी प्रास्ताविक केले. ससाणे यांनी शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. या वेळी प्रथम नगराध्यक्ष रामचंद्र उपाध्ये, शंकरराव बोरावके, श्यामराव कांबळे, राजाराम बोरावके, मधुकर देशमुख या माजी नगराध्यक्षांच्या वारसांचा व आजी, माजी पदाधिकाऱ्यांचा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.