तब्बल चोवीस तास उलटल्यानंतर महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याऱ्या पाच वाळूतस्करांसह १५ ते २० अज्ञात लोकांविरूध्द पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महसूल विभागाच्या या पथकावर रोखणाऱ्या कुख्यात गुंडासह दोघांची नावे मात्र अश्चर्यकारकरीत्या या फिर्यादीतून गायब झाल्याने केवळ सोपास्कार पुर्ण करण्यासाठीच ही फिर्याद दाखल करण्यात आल्याचे उघड झाले. दरम्यान तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी लेखणी बंद आंदोलन करून हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली होती.
गुरूवारी दुपारी तहसील कार्यालयातील लिपीक शरद झावरे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ कुलट, एस.बी. भांबरे, ए. व्ही. लासुरे, डी. एस. पाथवे, एस. डी. मऱ्हे हे तलाठी निघोजच्या कुकडी नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात कारवाईसाठी गेले होते. तेथे गेल्यानंतर आम्ही संबधितांना प्रत्येकी साठ हजार रूपये दिले असल्याचे सांगत वाळूतस्करांनी कारवाईस विरोध केला. तरीही कारवाई थांबविण्यात न आल्याने कुलट, पाथवे व लासुरे यांच्यावर पिस्तूल रोखून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. वाळूतस्करांचा रौद्रावतार पाहून या कर्मचाऱ्यांनी अखेर तेथून पळ काढला.
एकनाथ कुलट (वय ५२) यांनी दिलेल्या फिर्यादिवरून योगेश रसाळ, फुलसौंदर, मुकेश बिहारी,बाबाजी किसन कुदळे, रघुनाथ बबन वाव्हळ यांच्यावर शासकीय कामात अडथळा, दहशत, मारहाण तसेच दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकाने साठ हजार रूपये किंमतीची 12 ब्रास वाळू जप्त केली, मात्र दमदाटी करून वाहने पळवून नेल्याचे फिर्यादित म्हटले आहे. या फिर्यादीतील लिपीक शरद झावरे यांच्या म्हणण्यानुसार येथील वाहने पसार झाल्याचे फिर्यादित म्हटले आहे. या पथकाने पकडलेल्या वाहनांचा पंचनामा केल्यानंतर वाहने निघोज औटपोस्टला घेऊन चला, उद्या तहसिलदारांकडे दंडाची रक्कम भरा असे सांगितल्यानंतर गाडय़ा येथेच सोडून द्या असे सांगत कुलट यांच्या डोक्याला पिस्तूल लावण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या परिसरात कुख्यात गुंड वाळूतस्करी करीत असून त्याने व त्याच्या दोन साथीदारांनी पिस्तूलचा धाक दाखवून या पथकास पिटाळून लावल्याची चर्चा सायंकाळपर्यंत सुरू होती. प्रत्यक्षात फिर्यादीत मात्र त्याचा नामोल्लेख टाळण्यात आल्याने केवळ आलेले बालंट परतविण्यासाठी फिर्यादीची औपचारीकता पुर्ण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या पथकाला वाळूविरोधी कारवाईचा आदेश नव्हता, मात्र आज तशा अशयाचा आदेश तयार करण्यात आला. कारवाई करण्यात आली ते ठिकाण पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने पोलिसांनी सुरूवातीस फिर्याद घेणेही टाळले होते. अखेर चर्चेच्या गुऱ्हाळानंतर फिर्यादीचे सोपास्कार पुर्ण करण्यात येऊन या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान या पथकात श्रीपाद, साबळे व डहाळे या कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे या पथकातील कर्मचा-यांनी सांगितले होते. फिर्यादितून मात्र त्यांची नावे गायब झाली आहेत़  कुलट यांच्यासह पाथवे व लासुरे यांना मारहाण झाल्याचेही काल सांगण्यात आले होते, त्याचाही फिर्यादीत उल्लेख नाही. त्यामुळे तस्करीविरोधातील या पथकाच्या भुमीकेविषयी तर्क वितर्क लढविले जाउ लागले आहेत.