आपल्या विचारांशी ठाम नसलेल्या लोकांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळेच समाजामध्ये प्रश्न निर्माण होत असल्याचे मत साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी बुधवारी व्यक्त केले.
पुणे मराठी ग्रंथालयातर्फे डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते डॉ. अशोक कुकडे यांच्या ‘कथा एका ध्येयसाधनेची’ या पुस्तकास ना. ह. आपटे पुरस्कार आणि विजय शिंदे यांच्या ‘ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्या किनाऱ्याने’ या पुस्तकास ना. के. बेहरे पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रंथालयाचे अध्यक्ष मोहन दाते, कार्याध्यक्ष मुकुंद अनगळ आणि हेमंत कुलकर्णी याप्रसंगी उपस्थित होते. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले, पूर्वी डॉक्टर ग्रामीण आणि आदिवासी भागात जाऊन सेवा करीत असत. आता थोडी बरी परिस्थिती आल्यावर लोक शहराकडे येतात. औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल असो किंवा लातूरचे स्वामी विवेकानंद हॉस्पिटल; मुस्लिम मंडळींना आपल्याकडे येऊन इलाज करून घ्यावा असे का वाटते याचा विविध अंगांनी अभ्यास करायला पाहिजे. डॉ. अशोक कुकडे म्हणाले, वैद्यकीय क्षेत्र जीवनाला आणि जिवाला भिडणारे आहे.
या क्षेत्राकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. माहितीच्या विस्फोटातून प्रश्न वाढत आहेत. त्यामुळे अज्ञानातच सुख होते असे म्हणण्याची वेळ आली आहे. सगळेच डॉक्टर चांगले आहेत असा दावा करता येणार नाही. पण, अजूनही हे एकमेव क्षेत्र चांगले आहे असे निश्चिपणे म्हणता येईल. विजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.