वांग-मराठवाडी धरणग्रस्तांवर गेली १५ वष्रे अन्याय होत असून, प्रशासनाने बैठका घेऊन आश्वासनाशिवाय काहीही दिलेले नाही. महसूल आयुक्तांकडून सूचना आल्या, मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातून सूचनापत्रांची अंमलबजावणी होत नाही हे चुकीचे आहे. वांग मराठवाडीतील धरणग्रस्ताच्या मागण्यांसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात येऊन त्यांना न्याय द्यायला हवा, वांग-मराठवाडी धरणाची घळभरणी चुकीच्या पध्दतीने झाली असल्याने धरणग्रस्तांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. धरणाच्या गेटचे काँक्रीटीकरण झाले असतानाही ज्यांनी गेट उघडले नाही त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वांग-मराठवाडीच्या सत्यशोधन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली.
वांग-मराठवाडी धरणाच्या घळभरणीच्या तांत्रिकतेची व बुडीत स्थितीची पाहणी सत्यशोधन समितीचे अध्यक्ष व पाटबंधारे खात्याचे निवृत्त महासंचालक सतीश भिंगारे, मेरीचे संचालक व जलव्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. दि. मा. मोरे, एस. आर. गायकवाड, वर्षांताई गुप्ते, सुनीती सु.र. यांच्या तज्ज्ञ समितीने केली. त्यानंतर सातारा येथे पत्रकार परिषदेत समितीने त्यांनी आपली मते मांडली. या वेळी हेमा सोनी, प्रताप मोहिते, जितेंद्र पाटील, पांडुरंग पाटील व धरणग्रस्त उपस्थित होते.
वांग मरठवाडी धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले नाही. लोकांची जमीन व घरे पाण्यात जाणार आहेत, या गोष्टींचा विचार न करता घळभरणी केली ते चुकीचे आहे. त्यामुळे लोकांचा शासन व्यवस्थेवर विश्वास राहिला नाही. घळभरणी झाल्यामुळे येथील धरणग्रस्तांना अनेक यातना भोगाव्या लागत आहेत. वस्तुस्थिती पाहता गेट ऑपरेट करण्यासाठी काँक्रीटीकरण झालेले आहे. मात्र, याबाबत देण्यात आलेली माहिती चुकीची व संशयास्पद असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. जूनपासून वांग-मराठवाडी धरणातील पाणी न सोडल्याने पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथे आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही यंत्रणा नाही. धरणातील पाणी सोडण्यासाठी कोणाचीही नेमणूक केलेली नाही. त्यामुळे येथील धरणग्रस्तांनी करायचे काय? मुलांच्या शाळेचे काय? धरणग्रस्तांनी गाव सोडून जायचे का? असा सवाल या सदस्यांनी केला.
पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम व जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांचीही धरणग्रस्तांनी भेट घेतली. मात्र, प्रशासन धरणग्रस्तांची ससेहोलपटच करत आहे. धरणग्रस्तांच्या मागण्या शासन दरबारी जर मान्य होत नसतील तर आम्हाला नाइलाजाने मानवाधिकार आयोग व न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा सुनीती सु. र. यांनी दिला. धरणग्रस्तांच्या नेत्या मेधाताई पाटकर यांचे कार्यकर्तृत्व अजूनही धरणग्रस्तांचे नेते समजल्या जाणाऱ्या डॉ. भारत पाटणकरांना कदाचित समजलेच नसेल, असा टोलाही सुनीती सु. र. यांनी भारत पाटणकरांनी केलेल्या वक्तव्यावर लगावला.