व्यापारी ओमप्रकाश डागा यांची २६ लाखांची बॅग चोरीस गेल्याच्या घटनेला १५ दिवस लोटले. परंतु या गुन्ह्य़ाच्या तपासाला गती देण्यात पोलिसांना अपयशच आले.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील सुरुवातीला पोलीस भरती प्रक्रियेत गुंतले होते. पोलीस भरती आटोपताच या तपासाला गती मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आता १५ दिवसांनंतर तपास घुटमळलाच नाही, तर आता तो गुंडाळल्याचीच चर्चा शहरात आहे. घटनेनंतर जे दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले ते सराईत आरोपी नाहीत. आरोपी सराईत नसतील तर पोलिसी खाक्या दाखवून पोलीस घटनेच्या मुळापर्यंत जाऊ शकतात. या गुन्ह्यात तसे काही घडले नाही. ज्यांची रक्कम चोरीस गेली ते डागा जििनग प्रेसिंग संस्थेचे पदाधिकारी आहेत. या गुन्ह्याचा तपास का रेंगाळतो आहे? अशा पद्धतीने जर घटना घडू लागल्या आणि पोलीस कोणत्याच निष्कर्षांपर्यंत जात नसतील तर शहरात व्यापार-उदीम  कसा चालवायचा? यासारखे प्रश्न ते निवेदनाद्वारे अधीक्षकांकडे उपस्थित करतील, असे वाटले होते. मुळात संघटनेच्या वतीने ८ दिवस होऊनही निवेदन दिले गेले नव्हते.
जििनग-प्रेसिंग संघटनेतर्फे जे निवेदन अधीक्षकांना देण्यात आले, त्यात गुन्ह्याचा तपास रेंगाळल्याबद्दल खंत व्यक्त केली गेली नाही. गेल्या १८ मे रोजी ही घटना घडल्यानंतर १५ दिवस होऊनही तपास मात्र शून्य आहे. पोलीस प्रशासनातर्फे ‘तपास चालू आहे’ एवढे एकच पालुपद लावले जात आहे. घटनेच्या दिवशी स्वत: अधीक्षक घटनास्थळी आले. पोलीस यंत्रणा तत्परतेने शोधकार्यास लागली. श्वानपथक जागीच घुटमळले. नंतर काही दिवस पोलिसांच्या वतीने ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यातून मिळालेल्या फुटेजमधून गुन्ह्याचा तपास लागू शकतो, असे सांगितले जात होते. दोन आरोपींच्या आड आणखी संशयास्पद आरोपी आहेत असे पोलीसच सांगू लागले. प्रत्यक्षात या दोन आरोपींआडचा तिसरा चेहरा अजूनही दिसला नाही.